तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
samaka-ayurveda-tulsi-vivah : दैनिक तरुण भारतच्या आवाहनाला प्रतिसाद देत गोधणी सामका आयुर्वेद योग व वेलनेसमध्ये तुळशीविवाह सोहळा मोठ्या भक्तीभावाने आणि पारंपरिक उत्साहात पार पडला. या प्रसंगी देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव चंदा पवार यांनी उपस्थितांना तुळशीचे धार्मिक, सांस्कृतिक व आयुर्वेदिक महत्त्व सांगितले.
या विवाह सोहळ्यात टिळकवाडी परिसरातील समस्त महिलांनी पारंपरिक वेषात सहभाग घेतला. मंगल कलश, शंखध्वनी, फुलांच्या सजावटी आणि गाण्यांच्या गजरात तुळशी व श्रीविष्णूचा विवाह विधी पार पडला. चंदा पवार यांनी, तुळस ही केवळ एक पवित्र वनस्पती नसून ती आरोग्य आणि सकारात्मक उर्जेचा स्रोत आहे. आयुर्वेदात तुळशीला ‘विष्णूप्रिया’ असे म्हटले आहे, कारण ती शरीर, मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण करते, असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिलांनी तुळशीची प्रदक्षिणा घातली व आरोग्य, सौहार्द आणि समृद्धीची प्रार्थना केली.
तुळशीचे औषधी गुणधर्म
तुळस शरीरातील दोषांचे संतुलन राखते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोग, आणि ताणतणाव यामध्ये तुळशीचे सेवन अतिशय उपयुक्त आहे. घरामध्ये तुळशीचे रोप असल्यास वातावरण शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटरच्या माध्यमातून अशा धार्मिक-सांस्कृतिक उपक्रमांद्वारे आरोग्य, अध्यात्म आणि संस्कृती यांचा सुंदर संगम साधला जात आहे.