तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
jago-banjara-group : विदर्भातील प्रसिद्ध सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर, गोधनी (यवतमाळ) येथे मंगळवारी ‘जागो बंजारा’ व त्यांच्या समूहाने विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी भगवान धन्वंतरी ध्यान मंदिर, नक्षत्र वन, तसेच सामका आयुर्वेद रिसर्च सेंटरचे विविध योग व पंचकर्म उपचार विभाग पाहून समाधान व्यक्त केले.
भगवान धन्वंतरी ध्यान मंदिर हे विदर्भातील एकमेव आणि अद्वितीय मंदिर असून येथे दररोज धन्वंतरी मंत्र जप, आरती व ध्यानसाधना केली जाते. या मंदिराच्या परिसरात 27 नक्षत्रांशी संबंधित औषधी वनस्पतींचे नक्षत्र वन विकसित करण्यात आले आहे. प्रत्येक झाड हे विशिष्ट नक्षत्राशी निगडित असून त्यांचे औषधी, आध्यात्मिक व ज्योतिषीय महत्त्व नागरिकांना समजावून देण्यात येते.
सामका आयुर्वेद योग व वेलनेस सेंटर मध्ये आधुनिक जीवनशैलीतील ताणतणाव, स्थूलता, मधुमेह, सर्दी-खोकला, अॅलर्जी, सांधेदुखी, त्वचारोग इत्यादी आजारांवर पारंपरिक आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीने उपचार केले जातात. केंद्रात पंचकर्म चिकित्सा, नस्य, वमन, वस्ति, अभ्यंग, शिरोधारा, योग-प्राणायाम प्रशिक्षण तसेच नाडी परीक्षणाद्वारे प्रकृती विश्लेषण या सेवा उपलब्ध आहेत.
वैद्य पंकज पवार यांच्या मार्गदर्शनात या केंद्रात आरोग्यसेवेबरोबरच आयुर्वेद संशोधन, ग्रामीण आरोग्य जनजागृती, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रकल्प, आणि युवा आरोग्य जागरूकता उपक्रम राबवले जातात. ‘जागो बंजारा’ समूहातील प्रतिनिधींनी मंदिर आणि आरोग्य उपक्रमांची माहिती घेतली तसेच या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आरोग्य आणि संस्कृतीच्या संगमाचे कौतुक केले. सामका आयुर्वेद हे केवळ उपचार केंद्र नसून ते आरोग्य, अध्यात्म आणि पर्यावरणाचा सुंदर संगम आहे. येथे येऊन आम्हाला खèया अर्थाने आयुर्वेदाचे दैवी रूप अनुभवायला मिळाले, असे त्यांनी नमूद केले.
वैद्य पंकज पवार म्हणाले, आयुर्वेद म्हणजे केवळ औषधोपचार नव्हे, तर जीवनशैलीचे शास्त्र आहे. सामका आयुर्वेदचे ध्येय प्रत्येकाला ‘आरोग्यदायी देह, प्रसन्न मन आणि शांत आत्मा’ देणे. देवी सामका महिला बहुउद्देशीय संस्था व सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या केंद्रात सतत आरोग्य शिबिरे, योग सत्रे, औषधी वनस्पती संवर्धन आणि संशोधन उपक्रम राबवले जातात. या भेटीद्वारे ‘जागो बंजारा’ समूहाने सामका आयुर्वेदच्या आरोग्यप्रेमी प्रयत्नांना पाठिंबा देत भविष्यातही संयुक्त आरोग्य-जागृती उपक्रम हाती घेण्याचा मानस असल्याचे सांगितले.