महिलांच्या खात्यात ३० हजार, शेतकऱ्यांना मोफत वीज!

04 Nov 2025 12:40:04
पाटणा,
Tejashwi's election masterstroke बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन एकामागून एक अशा गाजणाऱ्या घोषणा केल्या आहेत. निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवस आधी तेजस्वी यांनी महिलांपासून शेतकरी आणि शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व वर्गाला गोड गोळी देत राजकीय समीकरणे ढवळून काढली आहेत.
 
 

Tejashwi
संग्रहित फोटो 
तेजस्वी यादव म्हणाले की, महाआघाडी सत्तेत आल्यानंतर माई बहेन योजने”अंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात थेट ३०,००० रुपयांची वार्षिक रक्कम जमा केली जाईल. सरकार स्थापन झाल्यानंतर मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच १४ जानेवारी रोजी, आमच्या माता-भगिनींच्या खात्यात हा संपूर्ण लाभ वर्ग करण्यात येईल, असं ते ठामपणे म्हणाले. याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर करताना त्यांनी सांगितले की, भविष्यात कोणत्याही कर्मचाऱ्याची बदली त्यांच्या मूळ जिल्ह्यापासून ७० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर केली जाणार नाही. त्यामुळे कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ येणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
 
शेतकऱ्यांसाठी घोषणांची मालिका पुढे सुरू ठेवत तेजस्वी यादव म्हणाले की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारी वीज पूर्णपणे मोफत दिली जाईल. “आज शेतकऱ्यांकडून सरकार प्रति युनिट ५५ पैसे आकारते, परंतु आमचं सरकार आल्यानंतर हा खर्च राज्य उचलेल,” असं त्यांनी स्पष्ट केलं. तेजस्वी यादव यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. राज्यातील ८,४६३ प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) यांना जनप्रतिनिधीचा दर्जा देण्यात येईल. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल आणि शेतकऱ्यांच्या हातात अधिक आर्थिक स्वावलंबन येईल, असा दावा त्यांनी केला.
 
भात, गहू आणि इतर प्रमुख पिकांच्या किमान आधारभावात वाढ करून शेतकऱ्यांना हमीभावाचा अधिक लाभ मिळेल, अशीही घोषणा त्यांनी केली. या घोषणांमुळे तेजस्वी यादव यांनी महिला मतदार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या भावनांवर थेट लक्ष्य साधले आहे. राजकीय जाणकारांच्या मते, या धडाकेबाज घोषणांमुळे बिहारच्या निवडणुकीतील समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो आणि महाआघाडीच्या प्रचाराला नवसंजीवनी मिळू शकते.
Powered By Sangraha 9.0