भारतीय महिला क्रिकेटचा दबदबा

04 Nov 2025 09:24:10
अग्रलेख
indian womens cricket पंचमीपर्यंत दिवाळीचा सण आटोपला. आत्ता कुठे फटाक्यांची धडाडधूम बंद झाली होती. पण, अचानक रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास भारतभरातील आकाशात आतषबाजी सुरू झाली आणि पुन्हा दिवाळीचा दिवस परतला की काय, असा माहौल तयार झाला. अर्थात, याचे कारणही दिवाळीच्या सणाइतकेच मोठे होते. 52 वर्षांच्या दीर्घ काळानंतर भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला नमवून आणि संपूर्ण जगाच्या नाकावर टिच्चून जगज्जेतेपद पटकावले. भारतातील लोकांसाठी क्रिकेट हा कायमच आवडीचा विषय राहिला आहे. त्यातच वर्ल्ड कप म्हटले की विचारूच नका! त्यावेळी भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचतो. यावेळी महिला क्रिकेटपटूंनी देदीप्यमान कामगिरी करत जगाच्या पाठीवर आपल्या कर्तृत्वाची आणि पर्यायाने तिरंग्याची मोहर उमटवली आहे. महिलांच्या सन्मानासाठी ओळखल्या जाणाऱ्या भारताला आता महिलांनी मोठा सन्मान मिळवून दिला हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे.
 
 

वर्ल्ड कप  
 
 
 
हा चमत्कार काही एका रात्रीत घडलेला नाही. तब्बल दोन दशकांपासून भारतीय महिला क्रिकेटपटूंचा संघर्ष, जिद्द, चिकाटी, सातत्य आणि परिश्रम घेण्याच्या वृत्तीचे हे फलित आहे. 1973 साली महिला विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. परंतु भारतीय महिला संघाला 52 वर्षांत कधीही विश्वविजेतेपद जिंकता आलेले नव्हते. दोनदा भारताच्या हातातून विश्वचषक निसटला. 2005 आणि 2017 मध्ये उपविजेतेपदावर त्यांना समाधान मानावे लागले. आता त्यांनी तिसऱ्यांदा 2025 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक विजय हा केवळ सध्याच्या संघाचा विजय नव्हे. तो भारतीय महिला क्रिकेटमधील काही दिग्गजांचे कित्येक दशकांचे समर्पण, चिकाटी आणि प्रगतीचा कळसाध्याय आहे. सुरुवातीच्या प्रणेत्यांपासून ते आधुनिक आयकॉनपर्यंत, आपल्या क्रिकेटपटूंनी जागतिक स्तरावर भारताच्या उदयाचा मार्ग मोकळा केला. आपण जग जिंकू शकतो, असा विश्वास त्यांनी आपल्या खेळाडूंना दिला. भारतीय महिला क्रिकेटमध्ये 50 वर्षांहून अधिक काळ खेळाडू आणि प्रशासक म्हणून काम करणाèया डायना एडुलजी यांनीही खेळाडूंना सतत प्रोत्साहन दिले. खेळाडूंनीही जिद्द कायम ठेवली. भारतीय महिलांचा यंदाच्या विश्वचषकापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तेवढा सोपा नव्हता. साखळी फेरीत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांकडून पराभूत झाल्यानंतरही मुलींनी जिद्द सोडली नाही. याच दरम्यान सलामी फलंदाज प्रतीका रावल हिच्या घोट्याला दुखापत झाली, त्यामुळे ती विश्वचषकाच्या बाहेर झाली. तिच्या जागी शेफाली वर्माला विश्वचषकाच्या संघात स्थान दिले गेले.indian womens cricket आधी जाहीर झालेल्या संघात तिला स्थान नव्हते, परंतु प्रतीकाच्या जागी तिला प्रवेश देण्याबाबतची विनंती बीसीसीआयने आयसीसीकडे केली. ती मान्य झाल्यामुळे भारतीय संघाला बळ मिळाले. उपांत्य सामन्यात भारतीय महिलांसमोर गत-विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते, परंतु हरमनप्रीत कौर आणि तिची चमू डगमगली नाही. कांगारूंनी 338 धावांचा डोंगर उभा करूनही भारतीय मुली वाघिणीसारख्या तुटून पडल्या आणि विश्वविक्रमी लक्ष्य गाठत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर अर्थात आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमाह रॉड्रिग्जने कमालीची फलंदाजी केली आणि नाबाद 127 धावांची शतकी खेळी करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंनीही भारतीय महिला संघाच्या जिद्द, चिकाटी आणि लढाऊवृत्तीचे कौतुक केले. विश्वविजेत्याला हरविल्यामुळे भारतीय महिला संघाचे मनोबल उंचावले. त्याचा फायदा त्यांना रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात झाला. डी. वाय. पाटील मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताच्या स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, कर्णधार हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर व ऋचा घोषने कमालीचा खेळ दाखविला. त्यातही शेफाली व दीप्तीचा अष्टपैलू खेळ डोळ्याचे पारणे फेडणारा आणि भारताच्या विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण करणारा ठरला. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये या दोघींनी कमालीची कामगिरी केली. त्याचे बक्षीसही त्यांना मिळाले. शेफाली सामनावीर ठरली, तर दीप्ती मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्व्हार्टने शतक झळकावले, तेव्हा एका क्षणी भारताच्या हातातून विश्वचषक निसटतो की काय, असे वाटत असताना दीप्ती शर्माने लॉरा वोल्व्हार्ट, अ‍ॅनेरिक डेर्केसेन, क्लो ट्रायॉन व नादिन डी क्लर्कला तंबूचा रस्ता दाखवून सामन्याला कलाटणी दिली. शेफालीनेही दोन बळी घेत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. आधी शेफालीने आपल्या बॅटची चमक दाखवीत 78 चेंडूंत 87 धावा, तर दीप्तीने 58 चेंडूंत 58 धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेवर 52 धावांनी विजय नोंदवीत ऐतिहासिक आयसीसी वन-डे विश्वचषकावर आपले नाव कोरले. तिसèया प्रयत्नात वन-डे विश्वचषकाला गवसणी घालता आल्यामुळे भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. हरमनप्रीत, स्मृती, शेफाली, दीप्ती व शतकवीर लॉराचा महत्त्वपूर्ण झेल टिपणाऱ्या अमनजोतने वन-डे विश्वचषकच जिंकला नाही, तर भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली.
भारताने ऐतिहासिक वन-डे विश्वचषक जिंकल्यामुळे आता महिला क्रिकेटचे अच्छे दिन आले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देशच नव्हे, तर जगभरातील क्रिकेट दिग्गजांनी भारतीय महिला संघाचे कौतुक व अभिनंदन केले. या विजयामुळे आता अधिकाधिक मुलींना क्रिकेट खेळण्यास प्रेरणा मिळेल तसेच महिला क्रिकेटमध्ये मोठी गुंतवणूक आणि संधी निर्माण होतील. डी. वाय. पाटील स्टेडियमवरील प्रेक्षकांची गर्दी लक्षात घेता पुढील महिला प्रीमियर लीग क्रिकेट बघण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी निश्चित वाढेल. तसेही भारतीय क्रिकेट नियामक मंडळ महिला क्रिकेटच्या वाढीसाठी, प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असतेच. पुरुष क्रिकेटपटूंप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनाही सराव-प्रशिक्षणासाठी तसेच विदेश दौऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. एवढेच नव्हे, तर आयसीसीने स्पर्धेत विजेत्या महिला संघालाही पुरुष संघाएवढाच रोख पुरस्कार देण्याचे धोरण अवलंबिले आहे. हा महिलांचा सन्मान आहे. विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला 40 कोटी रुपयांचा, तर दक्षिण आफ्रिकेला 20 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय बीसीसीआयने भारतीय महिला संघाला 51 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.
महिला क्रिकेटपटूंनी वन-डे व टी-20 क्रिकेट खेळण्यावरच नव्हे, तर कसोटी क्रिकेटवर सुद्धा आता भर देण्यात येत आहे. त्यानुसार द्विपक्षीय कसोटी मालिकांचे आयोजन करण्याचा बेत बीसीसीआयने आखला आहे. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेटमध्ये अधिकाधिक महिलांना, विशेषत: प्रतिभावान खेळाडूंना संधी उपलब्ध होणार आहे. भविष्यात पुरुषांप्रमाणे महिला खेळाडूंचेही वन-डे, टी-20 आणि कसोटी असे वेगवेगळे संघ निर्माण होतील आणि त्यातून नवनवीन प्रतिभावान खेळाडूंना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, तेव्हा या खेळाची आवड असलेल्या युवतींनी क्रिकेटकडे वळण्यास काही हरकत नाही. दृढनिश्चय करून केवळ मेहनत घेण्याची तयारी असावी. सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळेल. क्रिकेट कौशल्य आत्मसात करतानाच शारीरिक क्षमता वाढीसाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. या ऐतिहासिक विजयामुळे यापुढे भारतीय महिला क्रिकेट संघ जगात भारीच असणार आहे, असा विश्वास निर्माण झाला आहे. जगातील बारा देशांत एकदिवसीय महिला क्रिकेट हा खेळ खेळला जातो. आता कोणताही देश भारतीय महिला क्रिकेट संघाला कमी लेखणार नाही. भारतीय महिला क्रिकेटची ताकद इतर देशांना या विश्वचषकातून दिसलीच आहे. भारतीय महिला क्रिकेटचा दबदबा जगभरात असाच कायम राहो, हीच शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0