The earth is divided into two parts पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे एकसंध खडक नसून, ती अनेक विशाल तुकड्यांनी म्हणजेच टेक्टोनिक प्लेट्सनी बनलेली आहे. या प्लेट्स हळूहळू सरकतात, एकमेकांवर आदळतात किंवा विभक्त होतात. पण अलीकडे शास्त्रज्ञांनी एक असा शोध लावला आहे ज्याने संपूर्ण भूगर्भशास्त्राच्या अभ्यासाला हादरा दिला आहे. कॅनडातील व्हँकुव्हर बेटाजवळ, पॅसिफिक महासागराच्या खोल भागात असलेली एक टेक्टोनिक प्लेट आता दोन तुकड्यांमध्ये फाटत आहे. या भागाला कॅस्केडिया सबडक्शन झोन म्हणून ओळखले जाते आणि आता ती प्लेट हळूहळू तुटत असल्याची पुष्टी वैज्ञानिकांनी केली आहे.

या भूगर्भीय हालचालींचा मागोवा घेताना संशोधकांना समुद्राखाली जवळपास ७५ किलोमीटर लांबीची तडे गेलेली रेषा आढळली आहे. समुद्रतळाखालून पाठवलेल्या ध्वनीतरंगांच्या आणि भूकंपीय लहरींच्या साहाय्याने केलेल्या इमेजिंगमध्ये हे स्पष्ट दिसले की, या झोनमधील 'एक्सप्लोरर प्लेट' आता ताणामुळे फुटू लागली आहे. ही प्लेट जुआन डी फुका, पॅसिफिक आणि उत्तर अमेरिकन या इतर प्लेट्सशी जोडलेली आहे. येथे सतत प्रचंड दाब आणि ताण निर्माण होत असून, ती स्थिती म्हणजे जणू एखादा ताणलेला रबरबँड तुटण्याच्या अगदी क्षणावर आहे.
लुईझियाना विद्यापीठातील भूगर्भतज्ज्ञ ब्रँडन शक यांनी या घटनेचे वर्णन अत्यंत प्रभावी शब्दांत केले 'सबडक्शन झोन म्हणजे टेकडीवर धावणाऱ्या रेल्वेसारखा असतो; एकदा तो सुरू झाला की, तो थांबवणे म्हणजे अशक्यप्राय असते. संशोधकांच्या मते, ही प्रक्रिया तातडीने आपत्ती निर्माण करेल असे नाही. या फाटण्याची गती अत्यंत मंद आहे आणि ती लाखो वर्षांच्या कालावधीत घडते. मात्र, यामुळे लहान-मोठे भूकंप होण्याची शक्यता कायम राहते. इतिहास साक्षी आहे इ.स. १७०० मध्ये या भागात ९ तीव्रतेचा महाभूकंप झाला होता, ज्यामुळे जपानच्या किनाऱ्यांपर्यंत त्सुनामी पोहोचली होती. त्यामुळे या क्षेत्रातील हालचाली भविष्यात पुन्हा भूकंप किंवा त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तीचे कारण ठरू शकतात.
तथापि, शास्त्रज्ञ हे पृथ्वीच्या उत्क्रांतीतील नैसर्गिक टप्पा” मानतात. एका प्लेटचे विभाजन म्हणजे नव्या मायक्रोप्लेट्सचा जन्म पृथ्वीच्या बदलत्या रचनेचा पुरावा. या प्रक्रियेमुळे भविष्यात मोठे भूकंप टाळण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते, कारण ताण विभागला जातो. ब्रँडन शक म्हणतात, ही घटना पृथ्वीचा अंत नाही, तर तिच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. पृथ्वी सतत बदलते आहे, आणि पॅसिफिकच्या खोल गर्भात घडणारी ही हालचाल आपल्याला तिच्या जिवंतपणाची आठवण करून देते. म्हणूनच सध्या घाबरण्याचे कारण नाही, पण लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे. कारण या महासागराखाली सुरू असलेली ही अदृश्य हालचाल एक दिवस आपल्या ग्रहाच्या भविष्यातील भूगोलाचे रूपच बदलू शकते.