वरोडा,
Thorana village Chandrapur वरोडा तालुक्यातील थोराणा या गावी मागील चार-पाच वर्षापासून एकाही मुला-मुलींचा विवाह झाला नाही. अशावेळी ‘तरुण भारत’च्या सामुहिक तुळशी विवाहाने गावात चैतन्य आले. अख्खे गाव विवाह सोहळ्याला उपस्थित होते. हा सोहळा मोठा अपूर्व आनंद देणारा होता, अशी प्रतिक्रिया गावकर्यांनी व्यक्त केली आहे. श्री नरकेसरी प्रकाशनचे अमृत महोत्सवी आणि दैनिक तरुण भारताचे शताब्दी वर्षानिमित्त तुळस लागवड उपक्रमांतर्गत वरोडा तालुक्यातील थोराणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र आणि गावकरी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 2 नोव्हेंबर रोजी आयोजित तुळशी विवाह सोहळा अनोखा ठरला. या विवाह सोहळ्याला अख्खे गावच उपस्थित झाले.
गावातील शाळा परिसर, अंगणवाडी केंद्र, हनुमान मंदिर, जगन्नाथ बाबा मंदिर, रेणुका माता मंदिर आदी ठिकाणी तभाच्या आवाहनानुसार ऑगस्ट महिन्यामध्ये तुळस लागवड करण्यात आली होती. लागवड केलेली सर्व तुळशीची रोपे जगविण्यात आली. गावकरी आणि शाळा प्रशासनाच्या वतीने हनुमान मंदिर परिसरातील तुळशीचा विवाह करण्यात आला. या विवाहासाठी तरुण भारतच्या वतीने विवाहाचे संपूर्ण साहित्य पुरवण्यात आले. साडी-चोळी घालून तुळशीला एखाद्या नवरी प्रमाणे सजविण्याचे काम गावातील सुषमा भट, उषा रिंगोले, सविता बोदाडकर यांनी केली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देविदास बोदाडकर, मारोती तावाडे, प्रकाश बावणे व इतरांनी वरात काढली. वाजतगाजत ती वधू मंडपी आणली गेली. त्यानंतर मंगलाष्टके झाली. लक्ष्मी भट आणि रोहिणी रिंगोले यांनी ती म्हटली. गावकर्यांनी सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. या अनोख्या तुळशी विवाहाची पंचक्रोशीत चर्चा आहे.
या तुळशी विवाहामुळे गावातील मुलामुलींचे लग्न जुळावे, असे साकडे यावेळी गावकर्यांनी घातले. सोहळ्याला शाळा देविदास बोदाडकर, योगिता भोयर, पूजा मिलमिले, मिराबाई रिंगोले, माजी मुख्याध्यापक अरुण उमरे, सुषमा भट, अंगणवाडी सेविका उज्वला बोदाडकर, उषा रिंगोले, मारोती तावाडे, लक्ष्मी भट, रोहिणी रिंगोले, प्रकाश बावणे हेमंत तावाडे, केतन भट, मारोती भट, नागोबा बोदाडकर, तुळशीराम कुंभारे, राजू कुंभारे, विश्वनाथ भट, मधुकर भोयर, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर वाभीटकर, स्वप्निल वेले, अंगणवाडीतील विद्यार्थी उपस्थित होते.