कारंजा लाड,
Tulsi marriage in rural areas दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुळसीच्या लग्नाचे. हा दिवस म्हणजे बाळकृष्णाबरोबर किंवा शालिग्रामरूपी विष्णूबरोबर लग्न लावून देण्याचा उत्सव. तुळशीच्या लग्नाने दिवाळीची सांगता होते. कार्तिकी एकादशीनंतर दुसर्या दिवशी तुळशीच लग्न पार पडतं. देवउठनी एकादशीला विष्णू देव चार महिन्यांच्या निद्रावस्थेतून जागे होतो, असं म्हणतात. तुळशी विवाहपासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. पूर्वीच्या काळात तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीचं लग्न घरातील किशोरवयीन मुलासोबत किंवा शाळीग्राम दगडासोबत केलं जायचं.

प्रदोष काळात तुळशी विवाह केला जातो. तुळसी विवाहाच्या दिवशी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग असून ही धार्मिक कार्य अत्यंत शुभमानली जातात.तुळसी विवाह केल्याने कन्यादानाचं पुण्य प्राप्त होतं, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करण्यात येतं. त्यावर राधा दामोदरचे चित्र काढण्यात येतं. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचं वस्त्र परिधान करून वृंदावनात ऊस, झेंडूची फुलं अर्पण केली जातात, तर मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवण्यात येतो. हा विवाह सोहळा संध्याकाळी संपन्न करण्यात येतो. तुळशी विवाहासाठी अंगणात छान रांगोळी काढली जाते.प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार किंवा हौसेने तुळशीला सजवतात आणि हा सोहळा थाटात साजरा करतात. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडीदेखील परिधान करतात.
तुळशीला नवरीसारखे सजवलं जातं. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा केली जाते. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घातले जातात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नारळाने ओटी भरली जाते. तुळशीला नैवेद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार करण्यात येतं. लक्ष्मी-नारायणाची मूर्ती आणि तुलसीपत्रासोबत सोने आणि चांदीची तुळस आसनावर ठेवण्यात येते. श्रीकृष्णाला पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसवण्यात येतं. गोरज मुहूर्तावर वराचं पूजन करण्यात येतं. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. अशा प्रकारे हा सोहळ्या कुटुंबिय सदस्यांसोबत प्रियजनांसोबत ग्रामीण भागात साजरा करण्यात येत आहे.