फिलीपिन्समध्ये कालमेगी वादळाचा तडाखा

04 Nov 2025 14:02:41
मनिला.
Typhoon Kalmegi in the Philippines फिलीपिन्समध्ये ‘कालमेगी’ वादळाने अक्षरशः तांडव माजवला आहे. मध्य भागात आलेल्या या भीषण चक्रीवादळात किमान दोन जणांचा मृत्यू झाला असून शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. मुसळधार पावसासह आलेल्या वाऱ्याच्या प्रचंड झोतामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, रस्ते बंद झाले आणि वाहनांचा ठावठिकाणा उरला नाही. आपत्कालीन यंत्रणांना सतत बचावकार्य सुरू ठेवणे कठीण ठरत आहे.
 
 
Typhoon Kalmegi in the Philippines
वादळाचा मुख्य फटका निग्रोस ऑक्सिडेंटल प्रांतातील बाकोलोद आणि दक्षिण लेयटे भागाला बसला आहे. ताशी १४० ते १९५ किलोमीटरच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्र किनाऱ्यावरील वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. दक्षिण लेयटेमध्ये एका वृद्धाचा पूराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर बोहोलमध्ये एका व्यक्तीवर झाड कोसळल्याने जागीच प्राण गमवावे लागले. काही जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित झाला असून मोबाईल नेटवर्कही ठप्प झाले आहे.
 
पूर्व समरमधील होमोन्होन बेटावर वाऱ्याच्या तीव्र झोक्यांनी जवळपास ३०० झोपड्यांची छपरे उडवली. गुईवान शहरातील महापौरांनी सांगितले की, येथे पूर नसला तरी वाऱ्याने घरांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, ‘कालमेगी’ हे या वर्षी फिलीपिन्सला तडाखा देणारे २०वे वादळ आहे. सध्या हे वादळ पश्चिमेकडे सुमारे २५ किमी प्रतितास वेगाने सरकत असून पुढील २४ तासांत दक्षिण चीन समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. वादळाच्या धोक्यामुळे १.५ लाखाहून अधिक नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन दल सतत बचाव आणि पुनर्वसन मोहिमेत गुंतले आहेत. दरम्यान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक भागांमध्ये २०१३ मध्ये आलेल्या ‘हैयान’ वादळाच्या भीषण आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे, ज्यात तब्बल ७,३०० लोकांनी जीव गमावला होता.
Powered By Sangraha 9.0