उपराजधानीत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

04 Nov 2025 11:28:19
अनिल कांबळे
नागपूर,
Violence against women गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ, शारीरिक, मानसिक अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत. गेल्या चार वर्षांत उपराजधानीत महिलांवरील अत्याचाराच्या 5 हजार 460 घटना घडल्या असून आरोपींमध्ये ओळखीचे किंवा नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ता अभय कोलारकर यांना गुन्हे शाखा (डिटेक्शन) कडे माहितीच्या अधिकारातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कोलारकर यांनी 2022 ते 2025 दरम्यान महिला अत्याचारसंबंधी दाखल गुन्हे, तडीपार गुन्हेगारांवर तसेच दंगलीप्रकरणी आरोपींवर अटकेची कारवाई, याबरोबरच शहरातील तलावांमध्ये आत्महत्या करणा-यांची आकडेवारी मागितली. यात गुन्हेगारांवर तडीपारीची जोरात कारवाई, दंगलीप्रकरणी आरोपींची मोठी धरपकड तसेच तलावात आत्महत्यांचे प्रमाण घटलेली बाब समाधानकारक असली तरी महिला अत्याचारसंबंधी दाखल गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
 
 

Violence against women
 
 
गेल्या चार वर्षांत उपराजधानीत 5460 गुन्हे दाखल आहेत. तर गेल्या दहा महिन्यांत महिलांवरील अत्याचाराचे 1132 गुन्हे दाखल आहेत. शहरात भरोसा सेलच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याचा सकारात्मक प्रयत्न करण्यात येते. मात्र, पोलिस ठाण्यात महिलांच्या तक्रारींकडे पोलिस कर्मचारी गांभीर्याने लक्ष देत नाहीत. अनेक महिलांना दमदाटी करुन पोलिस आल्यापावली परत पाठवतात. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे.
 
 
सर्वाधिक ओळखीचे आरोपी
कौटुंबिक हिंसाचार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींमध्ये नातेवाईक, कुटुंबीय, ओळखीतील व्यक्ती, मित्र किंवा प्रियकराचा समावेश आहे. 2022 मध्ये महिला अत्याचारसंबंधी 1259, 2023 मध्ये 1556, 2024 मध्ये 1513 तर सप्टेंबर 2025 पर्यंत 1132 गुन्हे दाखल करण्यात आले. तडीपार गुन्हेगारांवरही जोरात कारवाई करण्यात आली. 2022 मध्ये 74, 2023 मध्ये 39, 2024 मध्ये 95 तसेच सप्टेंबर 2025 पर्यंत 74 आरोपींना तडीपार करण्यात आले. दंगलीप्रकरणीही पोलिसांकडून कठोर पावले उचलून आरोपींची धरपकड करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. 2022 मध्ये 293, 2023 मध्ये 376, 2024 मध्ये 373 तर ऑक्टोबर 2025 पर्यंत 237 दंगलखोरांना कारागृहाची हवा दाखविण्यात आली.
 
 
91 जणांची तलावात आत्महत्या
शहरातील तलावांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण लक्षणीय वाढ दिसत आहे. गेल्या तीन वर्षांत शहरातील तलावात 91 जणांनी आत्महत्या केली. 2022 मध्ये 44, 2023 मध्ये 20, 2024 मध्ये 27 जणांनी तलावात आत्महत्या केली. तसेच जेष्ठ नागरिकांच्या आत्महत्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 2022 मध्ये 8,2023 मध्ये 7 तर 2024 मध्ये 2 ज्येष्ठांनी तलावात आत्महत्या केली. यात वार्षिक अहवाल असल्याने सप्टेंबर 2025 पर्यंतची माहिती उपलब्ध नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0