नगर परिषदा व नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला

04 Nov 2025 18:52:36
चंद्रकांत लोहाणा
वाशीम,
Washim Municipal Council नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचे बिगुल वाजल्यामुळे गत काही वर्षापासून नगर परिषद व नगर पंचायत अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. वाशीम नगर परिषदमध्ये गेल्या चार वर्षापासून प्रशासक राज होता. आता तो संपून लोकनियुक्त अध्यक्षाच्या हाती सत्ता जाईल. वाशीम जिल्ह्यातील चार नगर परिषदा व एका नगर पंचायतसाठी निवडणूक होणार असल्यामुळे इच्छुकामध्ये उत्साह दिसून आला. तसेच राजकीय पक्षाकडूनही हालचाली वाढल्या आहेत.
 

Washim Municipal Council 
 
गत काही वर्षापासून प्रलंबित असणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची घोषणा निवडणुक आयोगाने केली आहे. वाशीम जिल्ह्यातील वाशीम, रिसोड, कारंजा, मंगरुळनाथ ह्या नगर पालिकेमध्ये तर मालेगाव नगर पंचायतमध्ये यावेळेवस निवडणूक होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. १७ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १७ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाची पडतमाळणी होणार आहे. अपील नसलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबर असेल तर अपील असलेल्या ठिकाणी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ही २५ नोव्हेंबर आहे. २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची अंतीम यादी जाहीर होणार असून, त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप होणार आहे.
४ नोव्हेंबर रोजी भाजपाने स्थानिक विश्रामगृहावर इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेऊन त्यादृष्टीने सर्व प्रथम सुरुवात केली आहे. भाजपा पक्षाकडून सर्वाधिक इच्छुक उमेदवार असले तरी पक्षश्रेष्ठी कोणावर विश्वास दाखविते हे लवकरच कळणार आहे.वाशीम नगर परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी सर्वसाधार गटासाठी राखीव असून, त्यासाठी डझनभर इच्छुक कामाला लागले आहेत. त्यात भाजपा पक्षाचे सर्वाधिक अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. याशिवाय उबाठा शिवसेना गट, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देखील रिंगणात उतरणार असल्याचे चित्र आहे. पण, युती, महाविकास आघाडी कायम राहील्यास या दोन्ही गटा शिवाय वंचित बहुजन आघाडी व अपक्षांचा देखील भरणा या निवडणुकीत दिसून येईल, हे आजतरी चित्र आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील आणि कोणाला अध्यक्षपदाची उमेदवारी देतील याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0