शिवसैनिक हा पक्षाचा आत्मा, जो काम करेल तोच पुढे जाईल!

05 Nov 2025 18:51:37
कोल्हापूर,
Eknath Shinde's statement उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जोरदार रणशिंग फुंकले आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या मेळाव्यात ते म्हणाले की, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिकांमध्ये भगवा फडकवणे ही गरज आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, एकजुटीने उतरून इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा. शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल करत म्हटले की, २ डिसेंबरला मतदान होईल आणि ३ डिसेंबरला निकाल जाहीर होईल. कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या निवडणुकीतही भगवा फडकणार आहे. त्यांनी स्पष्ट केले की, शिवसैनिक हा पक्षाचा आत्मा आहे आणि जो कार्य करेल तोच पुढे जाईल. शिवसेना कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि तयारीवर उभी आहे, असेही त्यांनी सांगितले.
 

Eknath Shinde
यावेळी शिंदेंनी सरकारच्या कामगिरीवरही भर दिला. शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे मदत पॅकेज, कर्जमाफीसाठी प्रक्रिया, महिलांसाठी 'लाडकी बहीण' योजना, बचत गटांसाठी वाढीव निधी, कोल्हापूरसाठी पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाला ५०० कोटी आणि केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी तर आयटी पार्कसह मोठे प्रकल्प जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विरोधकांवर टोला मारत म्हटले की, प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो.
 
शिंदेंनी विधानसभेत विरोधकांचा टांगा पलटी केला असल्याचे सांगितले आणि नगरपालिकांमध्येही त्यांचा पराभव होणार असल्याचे स्पष्ट केले. “महाराष्ट्राच्या जनतेने मोगलाई चालणार नाही हे दाखवून दिले आहे. कोल्हापूरात कुस्तीची ताकद आहे, विरोधकांना थेट धोबीपछाड द्या. गाव तिथे शिवशाही, घर तिथे शिवशक्ती,” असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, सत्ता येते-जाते पण नाव आणि मान गेले तर परत येत नाही. मतदार यादी तपासा, आपला मतदार राहिला पाहिजे. बूथप्रमुख हा विजयाचा शिल्पकार आहे, निवडणुकीतच नाही तर संकटातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहा. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला पक्ष नसून कुटुंब म्हणून समजावे, असे सांगितले. रोज शेकडो माणसे पक्षात प्रवेश करत आहेत. आतापर्यंत १०२ संघटना पक्षात प्रवेशासाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होण्याआधीच त्यांचा पराभव होईल आणि ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षाही मोठ्या फटाक्यांची रोषणाई महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे.
Powered By Sangraha 9.0