चांदूर बाजार,
farmer-daughter-becomes-joint-commissioner परिस्थिती कितीही प्रतिकूल असो परंतु, बुद्धिमत्तेला परिश्रमाची जोड लाभल्यास असामान्य कर्तृत्व घडल्याशिवाय राहत नाही. असेच असामान्य कर्तृत्व घडवले आहे, तालुक्यातील सोनोरी येथील रहिवासी व श्री क्षेत्र माधान येथील कस्तुरबा कन्या आश्रमशाळेत शिकणारी लीला बाजीराव इवने या आदिवासी कन्येने! तिची नुकतीच समाज कल्याण विभागात सहआयुक्त सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे.

लीला आदिवासी कुटंबातील तर आई शेतमजूर व घरी अठराविश्व दारिद्र्य अशी स्थिती आहे. घरात शिक्षणाचा अभाव तरी लहानपणापासून लीलाला शिक्षणाची आवड होती. त्यामुळे शिक्षण तिला स्वस्थ बसू देत नव्हते. शिक्षण घेण्याकरिता तिने शेतात मोलमजुरीचे कामे करीत प्राथमिक शिक्षण सोनारी येथील शाळेत घेतले. पुढील शिक्षणाकरिता थोर समाजसेविका ताराबेन मशरूमवाला यांच्या कस्तुरबा आश्रम माधान येथील वसतिगृहात ती दाखल झाली. ज्या ताराबेनने महिला आणि बालकल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्या आश्रमाच्या संस्कारात ती वाढली व मोठ्या जिद्द, अपार कष्टाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेमध्ये अफाट यश प्राप्त केले. farmer-daughter-becomes-joint-commissioner तिची नुकतीच नियुक्ती समाज कल्याण विभागात सहआयुक्त सारख्या अतिशय महत्त्वाच्या पदावर झाली आहे. लीलाचा शिक्षणाचा खडतर प्रवास, खरे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्याकरिता प्रेरणादायी उदाहरण आहे.इच्छाशक्ती आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तिच्या या यशाबद्दल कस्तुरबा आश्रम माधान येथील संस्थेचे पदाधिकारी व कस्तुरबा माध्यमिक शाळेचे शिक्षक आदींनी तिचे अभिनंदन केले. शिक्षकांनी तिचा घरी जाऊन सत्कार केला. एका निरक्षर व मजुरी करणार्या मातेची कन्या उच्च पदावर पोहोचल्याबद्दल सर्वांना तिचा सार्थ अभिमान वाटत आहे.