लुधियानात पुन्हा कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या

05 Nov 2025 11:31:07
लुधियाना,
Kabaddi player murdered in Ludhiana पंजाबमधील लुधियाना जिल्हा पुन्हा एकदा दहशतीने हादरला आहे. समराला तालुक्यातील मानकी गावात बुधवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी कबड्डीपटू गुरिंदर सिंग (वय २२) याची गोळ्या घालून हत्या केली. या हल्ल्यात त्याचा साथीदार धर्मवीर सिंग गंभीर जखमी झाला असून, त्याला चंदीगड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
 
Kabaddi player murdered in Ludhiana
 
मिळालेल्या माहितीनुसार, गुरिंदर आणि धर्मवीर हे दोघेही मानकी गावातील एका मेडिकल स्टोअरच्या बाहेर बसले होते. त्याचवेळी काही अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारात गुरिंदर सिंगचा जागीच मृत्यू झाला, तर धर्मवीर गंभीर जखमी झाला. ग्रामस्थांनी तत्काळ दोघांना समराला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र गुरिंदरला वाचवता आले नाही. डॉक्टरांनी धर्मवीरला प्रकृती गंभीर असल्याने चंदीगडला रेफर केले.
 
घटनेची माहिती मिळताच समराला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसराची पाहणी करून तपास सुरू केला. पोलिसांनी सांगितले की हल्लेखोरांनी कोणतेही चिन्ह मागे ठेवले नाही, त्यामुळे हत्येचे कारण आणि आरोपींची ओळख शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, लुधियानामध्ये कबड्डी खेळाडूंवरील हा आठवड्यातील दुसरा हल्ला आहे. यापूर्वी ३१ ऑक्टोबर रोजी जगराव परिसरात कबड्डीपटू तेजपाल सिंग याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या घटनेत पाच ते सहा जणांच्या टोळीने तेजपालवर आधी मारहाण करून नंतर गोळीबार केला होता.
 
त्या प्रकरणात पोलिसांनी गगनदीप सिंग आणि हरप्रीत सिंग उर्फ हनी या दोघांना अटक केली आहे. लुधियाना ग्रामीणचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अंकुर गुप्ता यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार ही हत्या जुन्या वैयक्तिक वादातून झाल्याचे दिसून आले आहे. सलग दोन कबड्डीपटूंच्या हत्यांमुळे क्रीडा क्षेत्रात आणि लुधियानातील स्थानिक समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांमध्ये कोणताही संबंध आहे का, याचाही शोध सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0