‘ती’ होती झाडीपट्टीची तळपती बिजली

05 Nov 2025 12:13:38
पराग मगर
नागपूर, 
marathi theatre day ती नाटकाच्या बोर्डावर आली की तिचा पदन्यास प्रेक्षकांना अचंबित करायचा, लावणीचा ठसका घायाळ करायचा तर अभिनय काळजात घर करायचा. तिची जादूच वेगळी होती. ब्लॅक ब्यूटी म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असलेली नाट्य व लावणी कलावंत दिवंगत पौर्णिमा काळे यांच्या लावणी नृत्याने व अभिनयाचे झाडीपट्टी आणि नागपूर रंगभूमीचा सुवर्णकाळ गाजविला. तिची आठवण काढताना आजही ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक देवेंद्र बोंद्रे आणि नाट्य कलावंत शोभा जोगदेव यांचे डोळे पाणावतात.
 
 

झाडीपट्टी  
 
 
झाडीपट्टी रंगभूमीला वैभव प्राप्त करून देण्यात नागपुरातील अनेक स्त्री कलाकारांचे मोठे योगदान आहे. यात शोभा जोगदेव, माधुरी खेेंगरे, विजया मुंजे, वत्सला पोलकमवार, मीना देशपांडे, शोभा जोगदंड(प्रीती बोंद्रे) पुष्पा धुळधुळ, विजया जगदाळे, आणि पौर्णिमा काळे यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. यातील काही कलाकार आज हयात नाहीत. पण त्यांच्या स्मृती अजरामर आहेत. यातीलच एक प्रमुख नाव राहिलेल्या पौर्णिमा काळे यांनी अभिनय आणि नृत्याने 70 चे दशक गाजवले. मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून तरुण भारतने त्यांच्या समकालीन राहिलेल्या शोभा जोगदंड यांच्याशी खास संवाद साधला. त्या म्हणाल्या, आम्ही दोघीही नृत्य कलाकार होतो. पौर्णिमा काळे डान्स पार्टीत ती आणि शोभा डान्स पार्टीतून आम्ही नृत्याचे कार्यक्रम करायचो. झाडीपट्टीत संगीत नाटकांचा काळ ओसरून सामाजिक नाटकांचा काळ सुरू झाला. ही नाटके लावणीप्रधान होती. आम्ही दोघीही अनेक नाटकांत लावणी सादर करायचो.marathi theatre day पुढे मी नाटकात भूमिकांकडे वळले. पण पौर्णिमाची लावणीची वीज झाडीपट्टीच्या नाटकांत अनेक दिवस तळपत राहिली. तिच्या पायातील घुंगरू आणि तिलक देवळीकरांची ढोलकी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडायचे. अवघ्या 35 व्या वर्षात तिने या जगाचा निरोप घेतला, पण कमी वेळात रसिक मायबापाचे प्रचंड प्रेम तिला मिळाले.
ती लावणीची सम्राज्ञी होती - देवेंद्र बोंद्रे
प्रायोगिक रंगभूमीवर ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक देवेंद्र बोंद्रे यांच्या विच्छा माझी पुरी करा या नाटकातून लावणीच्या माध्यमातून पौर्णिमा काळे यांचा प्रवेश झाला. याविषयी बोेंद्रे सांगतात, या नाटकाचे 100 प्रयोग झाले. यात तिची लावणी अप्रतीम असायची. तिच्या अदाकारीनेच अंधारमाया या नाटकात तिला प्रमुख भूमिका मिळाली. हे नाटकही मीच दिग्दर्शित केले. या नाटकाने तिला अभिनय क्षेत्रातही नवी ओळख दिली. तिचा मंचावरील वावर प्रेक्षकांवर जादूई प्रभाव टाकणारा होता. झाडीपट्टीत तिच्यासारखी लोकप्रियता नंतर फारच कमी लोकांना मिळाली. तिचे 35 व्या वर्षी अपघाती जाणे खरच झाडीपट्टीसह वैदर्भीय रंगभूमीचा चटका लावणारेच होते.
Powered By Sangraha 9.0