पांढरकवडा नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगणार चुरशीची लढत

05 Nov 2025 22:11:04
सुबोध काळपांडे
 
पांढरकवडा, 
Pandharkawada Municipal Council Elections येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध पक्ष व गटांकडून नप अध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या गुलाबी थंडी पडत असून निवडणुका घोषित झाल्याने आता वातावरण तापण्याची शक्यता दिसत आहे. नप निवडणुकीच्या मागील सत्ताधारी तसेच विरोधक पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नांची शर्यत सुरू झाली आहे. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, आणि स्थानिक आघाड्यांमधील नेतेगट आपापले समीकरण जुळवण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
 
pandarkavada np
 
स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यात सक्रिय असलेले काही नवे चेहरेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. तर अनुभवी माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांनाही पुन्हा संधी मिळण्याची दिसत आहे. शहरातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा आणि प्रशासनातील पारदर्शकता या विषयांवर यावेळी निवडणूक लढवली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यंदाची निवडणूक अनेक दिग्गज आणि नव्या उमेदवारांमध्ये चुरशीची ठरणार आहे. अंतिम उमेदवारी अर्ज सादर होताच शहरातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे.
 
 
Pandharkawada Municipal Council Elections सध्या तरी भाजपाकडून आतिश बोरेले यांची नप अध्यक्षपदाची पक्की समजली जात आहे. मागील निवडणुकीत अगदी अंतिम क्षणी बोरेले यांची उमेदवारी कापल्या गेली होती. परंतु मागील काही वर्षात बोरेले यांनी अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात केली आहेत. आमदार राजू तोडसाम व माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांनी बोरेले यांना हिरवी झेंडी दिल्याचे दिसून येत आहे. तर गजानन व आनंद वैद्य इच्छुक यादीत आहेत. मागील वेळी प्रहारच्या झेंड्याखाली असलेला खेतानी गट यावेळी शिवसेनेमध्ये सहभागी असल्याने व पालकमंत्री संजय राठोड यांची भक्कम साथ लाभणार असल्याने खेतानी गटातसुद्धा अनेक इच्छुक उमेदवार आहेत. यात राजू खेरा, आतिश चव्हाण, डॉ. अभिनय नहाते यांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावणे सुरू केले आहे. स्थानिक कृउ समितीतील एकतर्फी विजयाने आलेला हुरूप आणि खेतानी फाउंडेशनच्या सातत्याने सुरू असलेल्या सामाजिक कार्यावर आपणच विजयी होणार असल्याचे खेतानी गट सांगत आहे.
 
 
काँग‘ेसची अवस्था कमजोर दिसत असून शहर अध्यक्ष मनोज भोयर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तर तिवारी गटाने अजूनही आपले पत्ते उघडले नाहीत. मागील काही वर्षात शहराचा बट्ट्याबोळ झाल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. विशेषत: स्वच्छता आणि रस्ते यामुळे सामान्य नागरिक प्रचंड नाराज आहेत. गावात युवा टायगर फोर्सने काही वर्षातच आपली छाप सोडली असून त्याचे काही पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षांकडून आपले नशीब नगरसेवक पदासाठी आजमावणार आहेत. असे असले तरी मागील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याने यावेळीसुद्धा ‘लक्ष्मीदर्शन’ करूनच निवडणूक अशी उघडपणे चर्चा रंंगत आहे.
Powered By Sangraha 9.0