Political Truth Falsehood : सत्य आणि असत्य यांमध्ये एक अत्यंत धूसर अशी अदृश्य रेषा असते आणि तशीच रेषा सत्य आणि सत्ता यांमध्येही असते. सत्याची महती सांगणारे असंख्य दाखले समाजजीवनात पिढ्यान्पिढ्यांपासून दिले जात असतात आणि सत्याचे महत्त्व मनामनांवर बिंबविणाऱ्या कथाही सांगितल्या जातात. पण, सत्य पचविणे सोपे नसते. कदाचित त्यामुळेच सत्याची चाड असलेल्यांनाही असत्याचा आसरा घ्यावा लागला तर त्याची टोचणी लागून राहते. असे म्हणतात की, सत्याची झळाळी सातत्यपूर्ण असते. मात्र, राजकारणात असत्यच अधिक झळकवले जाते. एखाद्या असत्यावर कितीही प्रखर प्रकाशझोत टाकला तरी त्यामुळे त्याला सत्याची झळाळी येत नाही.
पण, त्यामुळे उजळलेले असत्यदेखील सत्य भासू लागते. कोणत्याही असत्याचा लोकांच्या मनावर सातत्याने मारा केला, तर असत्यदेखील सत्य वाटू लागते, असे राजकारणात मानले जाते. किंबहुना, असत्य हेच राजकारणातले सत्य असते. कदाचित त्यामुळेच राजकारणी व्यक्तीच्या सत्यवचनावरही माणसे लगेचच विश्वास ठेवत नसावीत. राजकारणी लोक असत्य का बोलतात, यावर काही बुद्धिमंतांनी खूप सखोल विचारमंथनही केले आहे. राजकीय नेते अनेकदा त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा अन्य काही कारणांसाठीदेखील जनतेशी खोटे बोलतात, असे सिद्धसुद्धा झालेले आहे. अर्थात, प्रतिस्पर्ध्यास गोंधळात टाकणे आणि जनतेस संभ्रमित करून त्याद्वारे राजकीय लाभ मिळविणे हाच त्यांचा उद्देश असतो. 'राजकीय नेत्यांचे खोटे बोलणे' या विषयावर जॉन मियरशेमर नावाच्या एका लेखकाने सुमारे दीड दशकांपूर्वी एक पुस्तक लिहिले. आंतरराष्ट्रीय राजकारणात खोटे बोलण्याच्या सवयींवर त्याने या पुस्तकात प्रकाशझोत टाकला आहे.
त्याच्या अभ्यासानुसार, राजकीय नेते जनतेला खोटे सांगतात, खोटी माहिती देतात आणि अशी खोटी माहिती अधिकाधिक चर्चेत राहावी यासाठी ते खोट्यावर खोट्यांची मालिका रचत राहतात. सत्य आणि असत्य यांमध्ये हादेखील एक महत्त्वाचा भेद असतो. सत्यामध्ये सातत्य असते. एकदा ते सांगितले गेले की, ते शाश्वतपणे तसेच राहते. असत्यामध्ये मात्र असे सातत्य नसते. उलट एक असत्य सांगितले गेले की, तेच सत्य आहे, हे पटवून देण्यासाठी अनेक असत्य बाबींचा आश्रय घ्यावा लागतो. म्हणूनच सत्य चप्पल चढवून घराबाहेर पडेपर्यंत एखादे असत्य गावभर फिरूनदेखील आलेले असते, असे म्हणतात. चर्चेत खोटेपणाचे महत्त्व वाढविणे या नीतीला राजकारणातच मोठे महत्त्व असते. खोटे पसरविणे ही राजकीय रणनीती मानली जाते, त्यामुळे राजकारणात सत्यापेक्षा असत्याला अधिक महत्त्व आणि प्रतिष्ठा दिली जाते. एखादाच कोणीतरी आपल्या सत्याच्या प्रयोगांची निर्भीड कबुली देतो आणि सत्याचे शाश्वत महत्त्व जाणून घेण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो. सर्वांना ते साधता येत नाहीच; उलट असत्याचा आश्रय घेतल्याने रणनीती अधिक यशस्वी ठरते, असेच राजकारणात मानले जाते. त्यामुळे 'सत्याचे प्रयोग' करणारा एखादाच कुणी महात्मा ठरतो आणि सातत्याने असत्याची रणनीती आखणारे राजकारण मात्र या माहात्म्याच्या सत्याच्या नावाने असत्याचा गवगवा करू लागते.
अलिकडे 'फॅक्ट चेक' नावाचे एक आभासी यंत्र आणि तंत्र उपलब्ध झाल्यापासून सत्य आणि असत्य यांतील भेदाचा छडा लावणे सोपे झाले असले, तरी त्यामुळे राजकारणातील असत्याचे महत्त्व अजिबात कमी झालेले नाही. उलट कोणते नेते आपल्या राजकीय कारकीर्दीत किती वेळा असत्य बोलले, याचा हिशेब ठेवणे सोपे झाले आणि त्यानुसार त्याच्या असत्यकथनाच्या राजकीय परिणामांची चर्चा होऊ लागली. 'राजकीय नेत्यांच्या असत्य बोलण्याच्या नीतीमागील सत्य' या नावाने प्रकाशित झालेल्या त्या बहुचर्चित पुस्तकात लेखक जॉन मियरशेमर यांनी तर नेत्यांच्या खोटे बोलण्याच्या नीतीचे अप्रत्यक्ष समर्थनही केले आहे. नेत्यांचे खोटे बोलणे हे अप्रत्यक्षपणे त्यांच्या राजकारणासाठी हिताचेच असते, असे हा लेखक मानतो. अमेरिकेने १९४० च्या दशकात ग्रीर नावाच्या एका युद्धनौकेबाबत असा प्रकार केल्याचे आढळते. ४ सप्टेंबर १९४१ रोजी एका जर्मन पाणबुडीने ग्रीरवर गोळीबार केला आणि बचावाचा बहाणा करून अमेरिकेने युद्धात उडी घेतली. या प्रकरणात अध्यक्ष फ्रैंकलिन रुझवेल्ट यांनी राष्ट्रहिताचा विचार करून खोट्याचा आश्रय घेतला, असे या लेखकास वाटते. कोणतेही खोटे बोलणे प्रभावी ठरविण्यासाठी लोकांचा विश्वास संपादन करावा लागतो आणि त्यात यश मिळाले की खोटे बोलणे सोपे होते व तेच लोकांना खरे वाटू लागते.
राजकारणातील असत्याला अनेक पैलू असतात. काही असत्यांचे परिणाम नकारात्मक होऊ शकतात आणि त्यातून फसवणुकीची संस्कृती फोफावू शकते. भीती निर्माण करणारे असत्य, धोरणात्मक बाबींच्या हितासाठी वापरले जाणारे असत्य, उदारमतवादी असत्य असे राजकारणातील असत्याचे वर्गीकरण अलिकडे उघड झालेले आहे. जे नेते असत्याचा आश्रय घेतात, त्यांच्या या कृतीचे विश्लेषण फॅक्ट चेकमुळे सोपे झाले आहे. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या काळात ३० हजार ५७३ वेळा असत्य किंवा लोकांची दिशाभूल करणारे वक्तव्य अथवा वेगवेगळे दावे केल्याचा निष्कर्ष वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राने फॅक्ट चेकच्या आधारे केला होता आणि टुथओमीटर नावाच्या साधनाने त्यास पुष्टी दिली होती. ट्रम्प यांनी या काळात केलेल्या वक्तव्यांपैकी सुमारे ७० टक्के वक्तव्ये अर्धसत्य, असत्य, चुकीची किंवा पूर्णतः खोटी होती, असे या पडताळणीत आढळले होते. आपत्या देशातील काही नेतेदेखील असत्य वक्तव्यनीतीचा अनेकदा वापर करत असल्याचे दिसून आले. मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या भयावह काळात तेराव्या बॉम्बस्फोटाविषयी शरद पवार यांनी केलेले वक्तव्य हा याच नीतीचा प्रकार होता. काही नेत्यांच्या असत्यनीतीला एका वैशिष्ट्याचा मुलामादेखील असतो.
अलिकडे तर असत्याचा प्रभावी वापर करण्याची नीती व त्यालाच सत्य म्हणून लोकांच्या माथी मारण्याची धडपड हा राजकीय स्वार्थाचा प्रकार राजकारणात लोकप्रिय होताना दिसतो. काही नेत्यांची वक्तव्ये दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी ती खोटी असल्याचे मात्र सिद्ध होऊ शकत नाही, हा असत्याचा राजकारणातील महिमा. महाराष्ट्रात आणि देशातही आजकाल मतदार याद्या, मतदान यंत्रे यांबाबत प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे आणि बनावटगिरीचे दाखले देताना दररोज त्यामध्ये नवनव्या आकड्यांची भर पडत आहे. महाराष्ट्रात ९६ लाख मतदार खोटे असल्याचा आरोप खरा असल्याचे सिद्ध झाले नसले, तरी तो खोटा असल्याचा निष्कर्षही निघालेला नाही. त्यामुळे नेमके काय समजायचे, हा प्रश्नच आहे. राजकारणात सत्ता हे उद्दिष्ट असते आणि साधनही. नेते अनेकदा आपली प्रतिमा उजळ करण्यासाठी, त्यावर लोकप्रियतेचा मुलामा चढविण्यासाठी आणि आपल्या कार्याचे किंवा यशाचे अतिशयोक्त वर्णन करण्यासाठी तसेच विरोधकांना नामोहरम करण्यासाठी सत्याचा विकृत किंवा एकांगी उपयोग करतात, असे अनेक दाखले इतिहासात नोंदले गेले आहेत.
लोक कोणती माहिती स्वीकारतात आणि कोणती माहिती नाकारतात, याचे नेमके विश्लेषण केल्यानंतर असत्याचा मारा किती प्रमाणात करावयाचा याचीही काही गणिते असतात. आपण जे बोलतो, ते लोकांना हवे आहे असे ठाऊक झाले की, लोकप्रिय ठरणाऱ्या असत्याचा भडीमार सुरू केला जातो. दुसरे असे की, आपल्या कृती आणि उक्तीमध्ये तफावत असल्याची जाणीव असली की अस्वस्थपणा येतो आणि असत्य कथनास योग्य व न्याय ठरविण्याचा आटापिटा सुरू केला जातो. कारण अशा प्रकरणांत सत्यापेक्षा भावनिकता अधिक महत्त्वाची मानली जात असते. निवडणुका, घोटाळे किंवा टीका यामध्ये जेव्हा त्वरित प्रतिक्रिया देण्याची गरज असते, तेव्हा आपली बाजू बळकट करणे एवढीच बाब महत्त्वाची ठरते, तेव्हा असत्याचाही ठोस आग्रही वापर केला जातो. कालांतराने ते असत्य उघडकीस आले, तरी लोकांची स्मृती अल्पकालीन असते, यावर राजकारण्यांचा विश्वास अधिक असतो. म्हणूनच सत्य आणि असत्याच्या या लपंडावात सत्य झाकण्यात यश येणाऱ्यालाच तात्कालिक विजय मिळण्याचा विश्वास असतो. सध्या तेच तर सुरू आहे!