तभा तुळशी विवाहात माहेरची भगवी अन् सासरची पांढरी टोपी

05 Nov 2025 18:38:51
अविनाश भोपे
पुलगाव, 
tabha-tulshi-vivah कोणतेही काम हाती घेतले की ते पुर्णत्वास नेण्याची विठ्ठल रुमिणी मंदिराचे अध्यक्ष केशवराव दांडेकर यांची हातोटी! तरुण भारतने तुळशी लावा अभियान राबवले आणि विठ्ठल मंदिराच्या विश्वस्तांमध्ये उत्साह संचारला होता... आज कार्तिकी पौर्णिमेला तुळशी विवाहासाठी तर डबल उत्साह होता. या विवाहात काय नव्हते. तुळशी नवरी होती, कृष्ण नवरदेव होता. पंढरपूरची वारी करणारे पांढर्‍या टोपीतील वारकरी वरपक्ष तर भगव्या टोपीतील गावकरी वधूपक्षात सहकारी होते. खर्‍या खुर्‍या लग्नातील सर्व सोपस्कार तुळशी विवाहात नाचणगावकरांनी पार पाडले.
 
 
tabha-tulshi-vivah
 
दैनिक तरुण भारतच्या शताब्धी वर्षानिमित्त आयोजित सामूहिक तुळशी विवाहाला देवळी-पुलगाव तालुयात प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आज ५ रोजी सकाळी १०.४५ च्या मुहूर्तावर नाचणगाव येथील विठ्ठल मंदिरात ‘तुळशीमाय आणि भगवान कृष्णा’वर अक्षदा पडल्या. या कार्यक्रमाला आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल रुमिणी देवस्थानात चातुर्मासानिमित्त चारही महिने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज कार्तिक पौर्णिमेला चातुर्मासाची समाप्ती आणि तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ५ वाजता काकड आरतीला गावातील नागरिक एकत्र आले. काकड आरतीनंतर गावकर्‍यांनीच मंदिराची केळीचे खांब व फुग्यांची सजावट करण्यात आली. सकाळी ९ वाजतापासुन लग्नघरी असते तशी लगबग सुरू झाली. हळूहळू गावातील वर्‍हाडी जमा होऊ लागले. पालखी सजवल्या गेली. १० वाजता वाजंत्रीही आले. दिंड्या, पताका, मंगलवाद्यासह पालखी शोभायात्रेला सुरुवात झाली. पालखीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिरात परत आलेल्या पांढर्‍या टोपीतील वरपक्षाचे भगव्या टोपीतील वधू पक्षातील लोकांनी पाय धुवून, हार घालून गुलाल लावत स्वागत केले. tabha-tulshi-vivah त्यानंतर वरपक्ष सभामंडपात आले. आकर्षक सजवलेल्या पितळी भगवान श्रीकृष्णाला मारोतीहून वधू माता पिता पुरुषोत्तम व मंगला चेडे यांनी आणले. त्यानंतर मुलीचे मामा सुधाकर सुरेसे यांनी विठ्ठल रुमिणीच्या गाभार्‍यातून आकर्षक सजवलेली वधू तुळशी आणली. अक्षदा वाटल्या गेल्या. पाच मंगलाष्टकं झाली आणि सावधान म्हणताच फटायांची आतषबाजी झाली बॅण्ड वाजला. सुलग्नासाठी गावात लागते तशी भलीमोठी रांग लागली. अतिशय आनंदात सोहळा पार पडला. काल्याचे कीर्तन झाले. दुपारी १२ नंतर जेवनाच्या पंगती उठल्या. गावकर्‍यांनी या तरुण भारतच्या सामूहिक तुळशी विवाहाचा आनंद लुटला.
१११ तुळशीचे रिटर्न गिफ्ट
नाचणगाव येथील चेडे दाम्पत्यांना तुळशीचे रोपटे वाटण्याचा छंद आहे. तुळशी लावा अभियानात त्यांनी नाचणगावात तुळशी दान दिल्या होत्या. आजच्या तुळशी विवाहात चेडे दाम्पत्याने वर माता पित्याची भूमिका पार पाडली. लग्नासाठी आलेल्या वर्‍हाड्यांना १११ तुळशीचे रोपटे रिटर्न गिफ्ट देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0