नप निवडणुकीचा बिगुल वाजला

05 Nov 2025 20:00:21
वर्धा, 
npa-election गेल्या साडेतीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. आता राज्य निवडणूक आयोगाने पालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण तापणार आहे. बर्‍याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रभागांतर्गत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.
 
 
elections-of-local-self-government
 
प्रथम जिल्ह्यातील सहा पालिकांच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर झाले. नंतर प्रभागांच्या आरक्षणाची सोडत निघाली. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाने मतदानासाठी २ डिसेंबर ही तारीख निश्चित केली आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तत्पूर्वी १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. npa-election त्याच दिवशी रिंगणातील उमेदवारांची संख्या निश्चित होणार आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी, सिंदी आणि वर्धा या सहा पालिकांच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता सुरू होणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिताही जाहीर केली असून आता नगरपालिका क्षेत्रात बरीच बंधने लागणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसह प्रशासनालाही यासंदर्भात आवश्यक ती काळजी घ्यावी लागणार आहे. वर्धा नगर पालिकेत नागरिकांचा मागास प्रवर्ग, हिंगणघाट येथे सर्वसाधारण महिला, आर्वीत सर्वसाधारण महिला, पुलगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, देवळी सर्वसाधारण आणि सिंदी रेल्वे येथे सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
१० नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. १७ नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख, १८ नोव्हेंबर अर्जाची छाननी, २१ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत, २६ नोव्हेंबर उमेदवारांची अंतिम यादी, २ डिसेंबर मतदान आणि ३ डिसेंबर निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे.
Powered By Sangraha 9.0