कंटेनर-कारमध्ये भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

05 Nov 2025 19:55:38
अल्लीपूर, 
Wardha accident अल्लीपूर-धोत्रा महामार्गावरील एकुर्ली फाट्याजवळ मंगळवार ४ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू तर १ गंभीर जखमी झाला. विरुद्ध दिशेने येणार्‍या एका वेगवान कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
 
 
Wardha accident
 
मृतांमध्ये अलमडोह येथील गौरव गावंडे (३२), चानकी येथील निशांत वैद्य (३५) आणि अल्लीपूर येथील वैभव शिवणकर (२८) यांचा समावेश आहे. तर अल्लीपूर येथील भूषण वडनेरकर (२८) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. गौरव गावंडे हा मुंबईहून आपल्या गावी आला होता. त्याला घेण्यासाठी भूषण वडनेरकर आपल्या एम. एच. ४९ यू. ०२७५ क्रमांकाच्या कारने धोत्रा चौकात गेला. त्याच्यासोबत निशांत वैद्य आणि वैभव शिवणकर हे सुद्धा होते. मित्रांसह ते कारने अल्लीपूरच्या दिशेने निघाले. कार एकुर्ली फाट्याजवळ आली असता विरुद्ध दिशेने येणार्‍या एम. एच. ३२ ए. के. ६१११ क्रमांकाच्या ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात गौरव व निशांत यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी भूषणने स्वत:ला सावरत आपल्या वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली. त्यानंतर भूषणचे वडिल शिवदास वडनेरकर आणि त्यांचा मुलगा मयूर सोबत घटनास्थळ गाठले. Wardha accident मयूरने भूषण आणि वैभवला सावंगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान वैभवचाही मृत्यू झाला. भूषणच्या छाती, पाय आणि डोयाला गंभीर दुखापत असून त्याच्यावर सावंगी मेघे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी अल्लीपूर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारचा चेंदामेंदा
दोन वाहनांतील धडक इतकी भीषण होती की धडकेनंतर प्रचंड आवाज झाला. अपघातात कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. मृतकांमध्ये दोघे फोटोग्राफर असल्याचे समजते.
Powered By Sangraha 9.0