नागपूर,
devendra-fadnavis: मिहानमधील अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेत न्युक्लिक अॅसिड टेस्टिंग सेंटरचा शुभारंभ आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. अशा प्रकारची सुविधा असणारी एम्स ही भारतातील पहिलीच सरकारी आरोग्य संस्था आहे. गॅमा ब्लड इरॅडिएटर या उपकरणाचेही उदघाटन झाले.
एम्सच्या रक्त संक्रमण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एनएटी ही रक्त, लाळ किंवा इतर नमुन्यातून रोगजंतू त्वरेने शोधणारी चाचणी आहे. या चाचणीद्वारे एचआयव्ही, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी या गंभीर आजारांचे निदान प्राथमिक अवस्थेतच होऊन संबंधित रुग्णावर तातडीने उपचार सुरू होऊ शकतात. अचूक निदान हे या चाचणीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
हे उपकरण रक्तपेढ्यांमध्ये लावल्यास गरजू रुग्णांना दूषित रक्त देण्याचा धोका जवळपास संपतो. गॅमा ब्लड इरॅडिएटरद्वारे अतिशय शुद्ध रक्त गरजू रुग्णांना मिळू शकते. रक्त संक्रमणातून होणारे आजार उपकरणामुळे रोखले जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दोन्ही उपकरणांची प्रशंसा करतानाच समाजातील गरजूंना त्याचा अधिकाधिक लाभ मिळावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
प्रारंभी एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवाणी, एम्समधील सर्व डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.