नागपूर,
Akhand Ghungroo Naad 2025 : धरमपेठ शिक्षण संस्थेद्वारा संचालित नटराज आर्ट अँड कल्चर सेंटरतर्फे ‘अखंड घुंगरू नाद २०२५’ हा सलग १२ तासांचा शास्त्रीय नृत्य महायज्ञ येत्या रविवार, ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांचा प्रसार आणि नृत्यगुरूंना नृत्यांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे. नटराज आर्ट अँड कल्चर सेंटर, रजत महोत्सव बिल्डिंग, खरे टाऊन, धरमपेठ येथे येत्या रविवारी सकाळी ७.३० वाजता नटराज पूजन व मंगलध्वनीने महायज्ञाची सुरुवात होईल. देशभरातील ४५ संस्थांच्या तब्बल २२० कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
नागपूरसह अमरावती, चंद्रपूर, केरळ, मणिपूर, झांसी येथील कलाकार भरतनाट्यम, कथक, कथकली, कुचीपुडी, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम आणि सत्रिया या आठही शास्त्रीय नृत्य प्रकारात आपली कला सादर करतील. नागपूरातील ख्यातनाम कथक गुरू ललिता हरिदास, मोहिनीअट्टम गुरू रत्नम् जनार्दनम, भरतनाट्यम गुरू माडखोलकर, तर ओडिसी नृत्य गुरू डॉ. मोहन बोडे आपली कला सादर करतील. प्राचार्य डॉ. रवींद्र हरिदास यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देताना सहभागी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नृत्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यावेळी समन्वयक अॅड. संजीव देशपांडे आणि संयोजक अवंती काटे उपस्थित होते.