बल्लारपूरच्या कुख्यात टोळीतील 10 आरोपींवर ‘मोक्का’

06 Nov 2025 20:21:10
चंद्रपूर,
Ballarpur notorious gang : सर्वसामान्य जनतेत दहशत निर्माण करणार्‍या, अनेक गुन्ह्यांची नोंद असलेल्या बल्लारपूर येथील कुख्यात गुंडाच्या टोळीतील प्रमुख चंद्रेश उर्फ छोटू देसराज सुर्यवंशी, येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक यासह एकूण 10 आरोपींविरूध्द चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999’चे (मोक्का) कलम लावण्यात आले आहे.
 
 
chand
 
20 ऑक्टोबर 2025 रोजी या टोळीतील सदस्यांना गंजवार्ड येथे 2 माऊझर गन (पिस्टल), 2 देशी कट्टे, 35 नग जिवंत काडतुस, 4 लोखंडी धारदार खंजर अशा घातक हत्यारासह दरोडा टाकण्याच्या बेतात असताना शहर पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींविरूध्द शहर पोलिस ठाण्यात कलम 3, 4/25 भारतीय हत्यार कायदा आणि कलम 310 (4) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासादरम्यान ही टोळी दरोडा टाकून प्राप्त पैशातून खुनासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले.
 
 
ही कुख्यात टोळी चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी व येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक यांच्या नेतृत्वात वर्चस्व निर्माण करण्यासाठी मागील काही वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने बेकायदेशीर जमाव तयार करुन दहशत निर्माण करणे, खून करण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, अश्लिल शिवीगाळ करणे, दंगा करणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, लोकसेवकाला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून धाकाने परावृत्त करण्यासाठी हल्ला किंवा फौजदारीपात्र बलप्रयोग करणे आदी गंभीर गुन्हे करीत होती.
 
 
त्यामुळे या टोळीवर कायद्याचा वचक व परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी त्यांच्याविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 चे कलम समाविष्ट होण्याबाबतचा आवश्यक प्रस्ताव पाठविण्यात आला. त्यानुसार या टोळीतील चंद्रेश उर्फ छोटु देसराज सुर्यवंशी (23), येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक (27), मुकेश राजु वर्मा (20), अमीत बालकृष्ण सोनकर (26), गौरिश श्रीनिवास कुसमा (19), अनवर अब्बास शेख (23) व त्यांच्या इतर साथीदारांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, 1999 (मोक्का) चे कलम लावण्यात आले आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार निशिकांत रामटेके, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, पोलि उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सहायक फौजदार अरुण खारकर, अंमलदार गजानन नन्नावरे व मोक्का पथकाने केली.
Powered By Sangraha 9.0