शहरातील नागरीक घरकुलाच्या लाभापासून वंचित

06 Nov 2025 17:33:27
वाशीम,
Deprived of the benefits of housing शहरातील विविध ठिकाणची शासकीय अतिक्रमणे नियमानुकूल करुन या जागेवर प्रधानमंत्री शहरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा या मागणीसाठी नगर परिषद व भूमी अभिलेख कार्यालयाला वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देवूनही कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे नागरीक हतबल झाले असून, नियमानुकूल व घरकुलाचे प्रस्ताव लालफितशाहीत अडकले आहेत. तसेच नगर परिषदेने दिलेल्या मोजणी पत्राला भूमी अभिलेख कार्यालयाकडून केराची टोपली दाखविण्यात आल्याने प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर नागरीक रोष प्रकट करत आहेत. याबाबत़
 
 
nivedan
 
सविस्तर असे की, शहरातील पंचशिलनगर, शेलु रोड, विटभट्टी खदान, चामुंडादेवी, भिमनगर, निमजगा, वाळकी रोड, शुक्रवारपेठ, काजीपट्टी, माहुरवेश, इनामदारपुरा, गवळीपुरा, नारायणबाबा मंदिर, घनमोडी, वाळकी मांजरे आदी भागातील नागरीक गेल्या अनेक वर्षापासून शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमणे करुन राहत आहेत. या जमिनी शासन धोरणानुसार नियमानुकूल करुन या जागेवर प्रधानमंत्री शहरी आवास योजनेनुसार घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी नागरीकांचा शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या राहत्या जागेवर घरकुल बांधुन मिळावे यासाठी १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार २०१९ पासून मागणी करण्यात येत आहे.
 
 
या मागणीनुसार नगर परिषदेने पात्र अर्जदाराची छाननी करुन जागेची मोजणी तातडीने करावी यासाठी २८ जून २०१९ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाला पत्र सुद्धा दिले आहे. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाने नगर परिषदेच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शहरातील विविध भागातील नागरीक अद्यापही घरकुलाच्या लाभापासून वंचित आहेत. याबाबत न.प.मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर मालती गायकवाड, शिला वैरागडे, निर्मला कांबळे, मंगला वानखेडे, मालता कांबळे, शोभा कांबळे, अनिता कांबळे, आम्रपाली खंडारे, रमा सावळे, रिना कांबळे, निशा कांबळे, शोभा कांबळे, माधुरी कांबळे, सुमित्रा कांबळे, अनुसया कांबळे, अलका कांबळे, शांता कांबळे, सुमन आवारे, सरस्वती भालेराव, मनकर्णा लगड आदींच्या सह्या आहेत.
Powered By Sangraha 9.0