महिलेकडून खंडणी वसुल करणार्‍या पत्रकारांच्या टोळीला अटक

06 Nov 2025 20:23:12
चंद्रपूर, 
Extortion case : पत्रकार असल्याचा धाक दाखवून असहाय विधवा महिलेकडून 1 लाखाची खंडणी वसुल करणार्‍या पत्रकारांच्या टोळीला रामनगर पोलिसांनी अटक केली.
 
 
jlk
 
 
 
5 नोव्हेंबर 2025 रोजी 5-6 व्यक्ती चंद्रपूर शहरातील एका असहाय विधवा महिलेल्या घरी गेले. ती अवैध काम करीत असून, त्याबाबत तिची बातमी प्रसिध्द न करण्यासाठी तिच्याकडून एक लाख रुपयाची मागणी या बोगस पत्रकारांनी केली. तसेच पैसे न दिल्यास तिला ठार करण्याची धमकी देऊन तिच्याकडून जबरदस्तीने एक लाख रुपये खंडणी घेतली. याबाबतची तक्रार त्या महिलेने रामनगर पोलिस ठाण्यात केली. तक्रारीवरून पोलिसांनी कलम 308 (5), 333, 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी या पत्रकारांबाबत माहिती काढली असता, ते चंद्रपूर शहरातील वेगवेगळया दैनिक वर्तमानपत्र, वेबपोर्टल न्युज व न्युज टीव्ही चॅनलचे संपादक, जिल्हा व तालुका प्रतिनिधी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आले.
 
 
सत्यशोधक न्युज, चंद्रपूर (वेबपोर्टल) मुख्य संपादक राजू नामदेव शंभरकर (57, रा. लालपेठ कॉलरी क्रं. 1, चंद्रपूर),  इंडिया 24 न्यूज, चंद्रपूर (वेबपोर्टल) चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कुणाल यशवंत गर्गेलवार (37, रा. विठ्ठल मंदीर वॉर्ड, मथुरा चौक चंद्रपूर), दैनिक विदर्भ कल्याण, उमरेड नागपूर (दैनिक वर्तमानपत्र) चंद्रपूर तालुका प्रतिनिधी अविनाश मनोहर मडावी (33, रा. इंदिरानगर, चंद्रपूर), भारत टीव्ही. न्यूज, आग्रा (टीव्ही. चॅनल) चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी राजेश नारायण निकम (56, रा. जमनजेट्टी पाटील वाडी, लालपेठ वॉर्ड, चंद्रपूर) या आरोपींना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, त्यांनी या गुन्हयाची कबुली दिली. या गुन्ह्यातील आरोपींचे आणखी दोन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांचाही पोलिस शोध घेत आहे.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे,निलेश वाघमारे, हनुमान उगले, जितेंद्र आकरे, शरद कुडे आदींनी केली.
 
खंडणी मागणार्‍यांची माहिती द्याः पोलिस प्रशासन
 
 
जिल्ह्यात कुणी पत्रकार अथवा पोलिस असल्याची बतावणी करुन अशा प्रकारचे फसवणूक करुन लुटमार केली असेल किंवा खंडणी मागत असेल, तर त्यांनी तात्काळ नजीकच्या पोलिस ठाण्याला किंवा डायल 112 वर संपर्क करुन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0