संजय राऊत वाचले पाहिजेत, तो माझा माणूस!

06 Nov 2025 11:24:23
बुलढाणा,
Gulabrao Patil's batting राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी बुलढाण्यातील एका सभेत नेहमीप्रमाणे फटकेबाज भाषण करून वातावरण पेटवले. अध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी प्रशासकीय यंत्रणा, विरोधक आणि आपल्या सहकाऱ्यांवर रोखठोक भाष्य केले. सभेदरम्यान गुलाबराव पाटील म्हणाले, "सांगा, कलेक्टर बडा आहे का गुलाबराव पाटील बडा आहे?" या एका वाक्याने उपस्थितांमध्ये हास्याचा आणि टाळ्यांचा वर्षाव झाला. पुढे ते म्हणाले, "सरकार दोन गोष्टींवर चालतते जीआरवर आणि सीआरवर... आणि हम जीआर भी निकलते और सीआर भी निकालते!" अशा शब्दांत त्यांनी आपल्या प्रभावशाली शैलीत प्रशासनावर चिमटे काढले.
 

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो 
यावेळी त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांच्या प्रकृतीवर भाष्य करताना म्हटलं, "बघा ना, संजय राऊत कसे ॲडमिट आहेत... ते माझे माणूस आहेत, वाचले पाहिजेत. मी देवाला प्रार्थना केली की त्यांना सद्बुद्धी दे." त्यांच्या या विधानाने प्रेक्षकांमध्ये हशा पिकला, पण त्याचवेळी उद्धव ठाकरे गटावरही त्यांनी टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना पाटील म्हणाले, देवाने जर त्या लोकांना सुबुद्ध दिली, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरलेले २० जणही टिकणार नाहीत. सभेत त्यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासाचाही उल्लेख केला. "मी फक्त बारावी पास आहे, कॉलेज शिकू शकलो नाही. पण बाळासाहेब ठाकरे यांनी मला विधानसभेचं तिकीट दिलं आणि कायदे बनवणाऱ्या मंडळात बसवलं. हेच माझं भाग्य आहे," असं त्यांनी सांगितलं.
याच भाषणात त्यांनी आपल्या आंदोलन काळातील आठवणीही शेअर केल्या "एका प्रकरणात मी, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ आणि बाप, आम्ही चौघेही एका बॅरेकमध्ये होतो,"असे सांगत त्यांनी शिवसैनिकांच्या संघर्षमय काळाचं स्मरण केलं. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी विनोदी शैलीत निष्कर्ष काढला, आमच्यावर पोलिस केस झाली तरी तो शिवसैनिकच करतो. आम्हाला गुंड म्हणतात, पण हे शंड असण्यापेक्षा गुंड असणं बरं! गुलाबराव पाटलांच्या या तुफान भाषणाने बुलढाणा जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला असून, त्यांच्या संवादशैलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Powered By Sangraha 9.0