मोदींनी ‘ट्रॉफीला हात न लावता जपली 'ती' परंपरा!

06 Nov 2025 12:10:55
नवी दिल्ली,
Modi did not touch the trophy भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषक 2025 जिंकत पहिल्यांदाच जागतिक विजेतेपद पटकावलं आणि देशभर आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा ऐतिहासिक पराक्रम गाजवल्यानंतर ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सर्व खेळाडूंनी भेट दिली. या वेळी घेतलेले फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी ट्रॉफीच्या अगदी शेजारी उभे असतानाही त्यांनी तिला हात लावला नाही. अनेकांच्या नजरा त्या क्षणाकडे वळल्या आणि यामागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता वाढली.
 

Modi did not touch the trophy  
 
खरं तर, वर्ल्ड कपची ट्रॉफी ही फक्त विजेत्या संघाच्या सदस्यांनाच स्पर्श करण्याचा अधिकार असतो, अशी पारंपरिक पद्धत आहे. ती खेळाडूंच्या कष्टांचा आणि त्यांच्या गौरवाचा सन्मान मानली जाते. पंतप्रधान मोदींनी हाच आदर जपत, स्वतः ट्रॉफीला हात न लावता सगळं श्रेय महिला खेळाडूंना दिले. मोदींनी या भेटीदरम्यान खेळाडूंशी संवाद साधला, त्यांच्या मेहनतीची दखल घेतली आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितलं की, देशाला अभिमान वाटावा असा हा क्षण आहे; या कन्यांनी भारतीय क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला आहे.
 
 
 
याआधीही अशीच घटना घडली होती. 2024 मध्ये जेव्हा भारतीय पुरुष संघाने टी-२० विश्वचषक जिंकला होता, त्यावेळीही मोदींनी ट्रॉफीला हात लावला नव्हता. तेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मध्ये उभे राहून त्यांनी केवळ विजेत्यांचा सन्मान केला होता. भारतीय महिला संघासाठी हा विजय केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नाही, तर देशातील महिला सक्षमीकरणाचं प्रतीक बनला आहे. 1973 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारत पहिल्यांदाच विजेता ठरला. दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ट्रॉफी हातातून निसटली होती, पण अखेर या वेळी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दीर्घ प्रतीक्षेला पूर्णविराम दिला. हा विजय भारतीय महिला क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात ठरतो आहे, जिथे प्रत्येक कन्या विजेतेपदाचं स्वप्न पाहू शकते आणि ते प्रत्यक्षात उतरवू शकते.
Powered By Sangraha 9.0