नागपूर,
Nagpur News : रा.स्व. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने छिंदवाडा ते नागपूर साहसी सायकल यात्रेचा आज रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात उत्साहात समारोप झाला. सुमारे 125 किलोमीटरचे अंतर पार करून 120 हून अधिक स्वयंसेवकांनी ही प्रेरणादायी यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली.
ही दोन दिवसीय यात्रा संघाच्या छिंदवाडा महाविद्यालय कार्य विभागातर्फे आयोजित करण्यात आली होती. या यात्रेचा मूलभूत उद्देश तरुणांमध्ये राष्ट्रभावना, सुदृढता, सामूहिक शिस्त व समाजजागृती या मूल्यांची जाणीव दृढ करणे हा होता.
राष्ट्रभावना, शिस्त व सुदृढतेचा संदेश
यात्रेची सुरुवात बुधवारी 5 नोव्हेंबरला सकाळी 6.30 वाजता छिंदवाडा संघ कार्यालयातून झाली. प्रारंभी स्वयंसेवकांना सायकल यात्रेचे उद्दिष्ट, मार्गक्रमण व सुरक्षाविषयक सूचना देण्यात आल्या. लिंगा, उमरानाला, रामाकोना, सौसरमार्गे बोरगावला पहिल्या दिवसाचा मुक्काम करण्यात आला.
या प्रवासादरम्यान स्वयंसेवकांनी एकसंघतेने, शिस्तबद्ध रचनेत सायकल चालवत, ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद साधला. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे ‘राष्ट्र प्रथम’ या भावनेने प्रत्येक स्वयंसेवक वागले. प्रवासभर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’च्या घोषणा देत सहभागी युवकांनी देशभक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला.
ठिकठिकाणी स्वागत
छिंदवाडा ते नागपूरपर्यंत ठिकठिकाणी नागरिक व संघ कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत केले. अनेक शाळा, स्थानिक संस्था व ग्रामस्थांनी सायकलस्वारांसाठी पेयजल, अल्पोपहार, विश्रांंती व्यवस्था केली.
यात्रेतील शिस्त, उत्साह व संघभावना पाहून स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. गुरुवारी सकाळी यात्रेने पुन्हा मार्गक्रमण सुरू केले. सावनेर, दहेगाव, कोराडी मार्गे प्रवास करत दुपारी 12 वाजता रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात यात्रेचा समारोप झाला.
सर्व स्वयंसेवकांनी डॉ. हेडगेवार स्मारक, महालमधील डॉक्टरांचे ऐतिहासिक घर व संघाच्या इतर महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. या भेटीद्वारे स्वयंसेवकांनी संघाच्या स्थापनेपासून आजवरचा इतिहास जाणून घेतला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात स्वयंसेवकांनी भारत मातेची सामूहिक आरती सादर केली. आरतीनंतर ‘एक संघ, एक संस्कार, एक राष्ट्र’ या घोषणांनी परिसर दुमदुमला.