कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री?

06 Nov 2025 06:00:00
वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी गुरुवार, ६ नोव्हेंबरला मतदान होत आहे. दुसर्‍या टप्प्यातील १२२ जागांसाठी मंगळवार, ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यांतील निवडणुकांची मतमोजणी शुक्रवार, १४ नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर New Chief Minister of Bihar बिहारच्या नवा मुख्यमंत्री कोण, याचा निर्णय होणार आहे. महाआघाडीने नेते तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले आहे. त्यामुळे यदाकदा महाआघाडीला बहुमत मिळाले तर तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार, हे नक्की. रालोआला बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
 
 
Cm-Chair
 
विद्यमान मुख्यमंत्री जदयुचे नितीशकुमार यांच्या नेतृत्वात रालोआ विधानसभेची निवडणूक लढवत आहे. भाजपाने तसे जाहीरही केले निवडणुकीनंतर नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील, असे जदयुने वारंवार स्पष्ट केले. नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाला लोजपा रामविलासचे नेते केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. २०२० ची विधानसभा निवडणूक चिराग पासवान यांनी स्वबळावर लढवली होती; स्वबळावर लढवली म्हणण्यापेक्षा जदयुच्या विरोधात लढवली होती. १३१ जागा लढवणार्‍या लोजपाला फक्त एक जागा जिंकता मात्र, त्याने अनेक मतदारसंघात जदयुचा पराभव केला. त्यामुळे जदयुचे संख्याबळ कमी झाले. ८० जागांवरून हा पक्ष ४३ जागापर्यंत खाली घसरला. त्यामुळे यावेळी चिराग पासवान यांची नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाला पाठिंबा द्यावा, याचे महत्त्व जदयु आणि नितीशकुमार यांच्यासाठी अनन्यसाधारण आहे. यावेळी लोजपा रामविलास रालोआचा घटक पक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवत आहे. या पक्षाला २९ जागा मिळाल्या. लोजपा रालोआत आल्याचा सर्वांत मोठा फायदा जदयुला मिळणार आहे. लोजपा जदयुची मते खाणार नसल्यामुळे यावेळी जदयुचे जास्त म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत जिंकले त्यापेक्षा जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रालोआ ही निवडणूक मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात लढवत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी असे भाजपा नेते वारंवार सांगत आहे. या निवडणुकीत रालोआला बहुमत मिळणार, याबद्दल कोणाच्याच मनात शंका नसली, तरी मुख्यमंत्री कोण होणार, याबद्दल मात्र उत्सुकता आहे. नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता सर्वांत जास्त असली, तरी राजकारणात कधी काय होईल, हे कोणीच सांगू शकत नाही.
 
 
देशात बिहार हे एकमेव असे राज्य म्हणावे ज्यात जवळपास २० वर्षांपासून सत्तेवर असला तरी भाजपाला New Chief Minister of Bihar मुख्यमंत्रिपद कधी मिळाले नाही. २० वर्षांपासून भाजपाला उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावे लागते. सुरुवातीला भाजपाला एक उपमुख्यमंत्री मिळत होता. २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर दोन उपमुख्यमंत्री मिळत आहेत. पण दोन उपमुख्यमंत्री मिळून एक मुख्यमंत्री होत नाही. मुख्यमंत्री हा मुख्यमंत्रीच असतो. त्यामुळे यावेळी तरी किमान मुख्यमंत्री व्हावा, असे त्या राज्यातील भाजपाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. भाजपाला मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घाईगर्दीत घेता येणार नाही. राजकारणातील सर्व शक्यता पडताळूनच भाजपाला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा लागेल. कारण भाजपाच्या या निर्णयाचा परिणाम फक्त बिहारमध्येच नाही तर राष्ट्रीय राजकारणावरही होण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर आणि निर्विवाद बहुमत मिळाले नाही. भाजपाचा विजयरथ २४० जागांवर अडला. भाजपाला बहुमतासाठी ३२ जागा कमी पडल्या. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारला चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसमचा आणि नितीशकुमार यांचा जनता दल संयुक्तचा पाठिंबा घ्यावा लागला. तेलगू देसमचे लोकसभेत १६ आणि जदयुचे १२ खासदार आहेत. केंद्रातील मोदी सरकार नितीशकुमार यांच्या जदयुवर अवलंबून आहे. त्यामुळे नितीशकुमार यांना दुखावणे भाजपाला तसे परवडणारे नाही.
 
 
गेल्या काही वर्षांत नितीशकुमार यांची प्रकृती ठीक राहात नाही, चालताना आणि बोलताना त्यांचा तोल जातो, स्मरणशक्तीही पहिलेसारखी राहिली नाही. तरीसुद्धा नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाचा मोह सुटत नाही. नितीशकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ देशात सर्वांत जास्त नसला, तरी देशात सर्वांत जास्त वेळा शपथ घेणारे म्हणून त्यांचे नाव नोंदले गेले आहे. यावेळी नितीशकुमार मुख्यमंत्री झाले तर दहाव्यांदा ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, त्यावरही राज्यातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. भाजपा राज्यात सर्वांत जास्त जागा जिंकणारा पक्ष राहील, दुसर्‍या क्रमांकासाठी जदयु आणि राजदमध्ये टक्कर राजद दुसर्‍या क्रमांकावर आला तर जदयु तिसर्‍या क्रमांकावर जाईल आणि जदयु दुसर्‍या क्रमांकावर आला, तर राजद तिसर्‍या क्रमांकावर जाईल. काँग्रेस चौथ्या स्थानावर राहील. म्हणजे भाजपा आणि काँग्रेस यांचे बिहारच्या राजकारणातील स्थान पक्के आहे.
 
 
New Chief Minister of Bihar  जदयु आणि राजद यांच्या आमदारांची बेरीज १०० च्या वर जात असेल तर भाजपाला आपल्या व्यूहरचनेचा फेरविचार लागेल. कारण भाजपाने नितीशकुमार यांना डावलून आपला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला तर नितीशकुमार भाजपाला धक्का देऊ शकतात. नितीशकुमार भाजपाला धक्का देतीलच असे नाही, पण धक्का देण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण याच्या आधी दोन वेळा नितीशकुमार भाजपाची साथ सोडून राजदसोबत गेले होते आणि त्यांनी सरकारही स्थापन केले होते. नितीशकुमार कोणती भूमिका घेतील, हे सांगता येत नाही. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो, तसाच शत्रूही नसतो. नितीशकुमार ज्यावेळी भाजपाचे मित्र होतात, तेव्हा राजदला शत्रू समजतात आणि राजदचे मित्र होतात, तेव्हा भाजपाला शत्रू समजतात. नितीशकुमार यांच्या शत्रू आणि मित्राच्या भूमिकेतील बदल अतिशय जलदगतीने होत असतो. नितीशकुमार यांचे राजकारण अनाकलनीय म्हणावे
 
 
२०२० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा जदयुच्या जागा कमी होत्या, तरीसुद्धा भाजपाने मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांना दिले होते. यावेळीही त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारत येत नाही. जदयुला भाजपापेक्षा जास्त जागा मिळाल्या तर मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्याकडे जाईल आणि भाजपापेक्षा जदयुच्या जागा कमी असल्या, तरी नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील. विधानसभा निवडणुकीनंतर वर्षभर तरी रालोआचे मुख्यमंत्री असतील. नितीशकुमार यांचा जन्म मुख्यमंत्रिपदासाठीच झाला, असे म्हणावे लागेल. कधी नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाच्या मागे धावतात तर कधी मुख्यमंत्रिपद नितीशकुमार यांच्या मागे धावत येते. 
 
९८८१७१७८१७
Powered By Sangraha 9.0