वॉशिंग्टन,
Record shutdown in America अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि प्रदीर्घ सरकारी शटडाऊन आता ३६ व्या दिवशी पोहोचला आहे. देशातील अनेक सरकारी सेवा ठप्प झाल्या असून, लाखो संघीय कर्मचाऱ्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. अन्न मदत, बालसंगोपन निधी आणि इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्याने सामान्य नागरिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षामध्ये चाललेल्या मतभेदांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्ससोबत तडजोडीला नकार दिल्याने शटडाऊन अधिकच लांबला आहे. २०१९ मध्ये ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातही ३५ दिवसांचे अंशतः शटडाऊन झाले होते, परंतु या वेळी ते सर्वाधिक प्रदीर्घ ठरले आहे.

शटडाऊनमुळे देशातील विमान उड्डाणे वेळेत होत नाहीत, तर हवाई वाहतूक नियंत्रकांची कमतरता गंभीर बनली आहे. वाहतूक सचिव शॉन डफी यांनी इशारा दिला आहे की, पुढील काही दिवसांत राष्ट्रीय हवाई क्षेत्राचे काही भाग बंद करण्याची वेळ येऊ शकते. संघीय कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय कामावर जाण्याची सक्ती करण्यात आली आहे, तर अनेकांना जबरदस्तीने सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे देशातील प्रशासकीय आणि आर्थिक हालचालींवर मोठा परिणाम झाला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून संकेत दिले होते की, शटडाऊन सुरू असतानाच सरकार ४२ दशलक्ष नागरिकांना मिळणारी अन्न मदत थांबवू शकते. मात्र, व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी नंतर स्पष्ट केले की प्रशासन न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करेल.
दरम्यान, ट्रम्प यांनी डेमोक्रॅट्स सरकार पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शविल्याशिवाय त्यांच्या मागण्यांवर चर्चा न करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यांच्या मागण्यांमध्ये आरोग्य विमा अनुदान रद्द करण्यासह काही धोरणात्मक बदलांचा समावेश आहे. २०१९ च्या शटडाऊनप्रमाणे या वेळी ट्रम्प यांनी कोणत्याही चर्चेला किंवा तडजोडीला वाव दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसमधील दोन्ही पक्षांतील तणाव वाढला असून, सध्याचा प्रशासकीय गोंधळ लवकर सुटेल अशी चिन्हे दिसत नाहीत. या शटडाऊनमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असून, नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. तज्ञांच्या मते, जर लवकरच तोडगा निघाला नाही तर देशाच्या आर्थिक घड्याळाला दीर्घकालीन धक्का बसू शकतो.