नवी दिल्ली,
Tata's surprise gift to women cricketers भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी विजय मिळवत इतिहास रचला. विश्वचषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिलांनी आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केली. या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरात महिला संघाचे कौतुक होत आहे. त्यांच्या या अविस्मरणीय यशाबद्दल कृतज्ञता म्हणून देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सने टीम इंडियाला एक आगळीवेगळी भेट जाहीर केली आहे.
महिला टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सकडून प्रत्येक खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफला नवी “टाटा सिएरा SUV” भेट दिली जाणार आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्रा यांनी महिला संघाचे अभिनंदन करताना सांगितले, भारतीय महिला संघाने आपल्या चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर देशाला अभिमानाचा क्षण दिला आहे. त्यांच्या या यशाचा सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. टाटा सिएरा ही भारतीय वाहन इतिहासातील एक वारसा आयकॉन आहे आणि ती अशा प्रेरणादायी विजेत्यांना भेट देणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिला संघातील प्रत्येक सदस्याला २५ नोव्हेंबर २०२५ रोजी लाँच होणाऱ्या सिएरा SUV च्या पहिल्या बॅचमधील टॉप-एंड मॉडेल्स दिली जाणार आहेत. ही SUV ९० च्या दशकातील लोकप्रिय “लाइफस्टाइल व्हेईकल” सिएराचे आधुनिक रूप आहे. नव्या सिएरामध्ये जुना 'रॅप-अराउंड ग्लास' लूक आधुनिक डिझाइनसह पुनर्रचित करण्यात आला आहे. यामध्ये कनेक्टेड एलईडी लाईट बार, थ्री-स्क्रीन डॅशबोर्ड, लेव्हल-२ ADAS, आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी आधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये असतील.
इंजिन पर्यायांमध्ये १.५ लिटर टर्बो पेट्रोल आणि २.० लिटर टर्बो डिझेल अशा दोन आवृत्त्या असतील, तर इलेक्ट्रिक (EV) मॉडेल नंतर बाजारात दाखल होणार आहे. SUV ची अंदाजे किंमत १३.५० लाख ते २४ लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. या भेटीमुळे टाटा मोटर्सने केवळ एका ऐतिहासिक विजयाचा गौरवच केला नाही, तर भारतीय महिला खेळाडूंच्या परिश्रम, जिद्द आणि यशाचाही सन्मान केला आहे. देशातील महिलांसाठी ही भेट प्रेरणादायी ठरणार आहे.