तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Yavatmal News : शहरात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. अवधूतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत तर मोठ्या प्रमाणात भिंगरी तसेच मटका यांसह इतर अवैध धंदे सुरू आहेत. या भिंगरीत यवतमाळातील तरुणाई मोठ्या प्रमाणात आहारी जात आहे. दुसरीकडे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी गुन्हेगारीकडे वळणाèया मुलांसाठी ‘प्रस्थान’ अभियान सुरू केले आहे. या अभियानाला अवधूतवाडी पोलिसांकडून ग्रहण लावण्यात येत असल्याची चर्चा पोलिस विभागात सुरू आहे.
जिल्ह्यातील ‘क्रीम ठाणे’ म्हणून अवधूतवाडी पोलिस ठाण्याची ओळख आहे. या ठाण्यांतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात. हे अवैध धंदे बंद करण्यात यावे, यासाठी वारंवार नागरिकांकडून मागणी केल्या जाते, तरीही अवधूतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत मटक्यासह ‘भिंगरी’ जोरात सुरू आहे.
या भिंगरीचा नाद मोठ्या प्रमाणात तरुणांना लागत आहे. त्याचबरोबर या परिसरात मुलांच्या टोळ्या अंमली पदार्थांच्या नशेतून गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकल्या जात आहे. शासनाच्या नियमांनुसार बिअर शॉपी चालकाला सीलबंद बिअरच विकण्याची परवानगी आहे. तरीदेखील अवधूतवाडी पोलिस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या बिअर शॉपीवर पोलिस विभागातील काही कर्मचाèयांना लक्ष्मीदर्शन देऊन बिअर शॉपीतच पिण्याची व्यवस्था केल्या जात आहे.
या सर्व बाबींमुळे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी सुरू केलेल्या अभियानाला हरताळ फासण्यात येत असल्याने याकडे अधीक्षक चिंता यांनी लक्ष देऊन अवधूतवाडी पोलिस ठाण्यातंर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा नागरिकांतून देण्यात येत आहे.
‘साहब’ मै देख लैता
अवधूतवाडी पोलिस ठाण्यात ‘रुपेश’चा बोल-बाला असून, लक्ष्मीदर्शनपासून इतर कामात रुपेश पुढे असतो. कोणत्याही कामाबाबत ‘साहब मै देख लैता’ असे म्हणून वरिष्ठांच्या मनात रुपेशने घर केले आहे. कोणत्या प्रकरणात लक्ष्मीदर्शन होते का, यावर रुपेशचा जोर असल्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे.