पवनकुमार लढ्ढा
चिखली,
adarsh-marathi-primary-vidya-mandir : एमआयडीसी परिसरात किरकोळ कारणामुळे लागलेल्या आगीत घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालेल्या लक्ष्मणराव सरनाईक यांच्या कुटुंबाला शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिराने माणुसकीचा हात देत आधार दिला आहे. यामुळे संकटात सापडलेल्या सरनाईक कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.
चिखली येथे एमआयडीसी परिसरात कोटेच्या यांच्या गोडाऊनजवळ वास्तव्यास असलेल्या लक्ष्मणराव सरनाईक यांच्या घराला अचानक आग लागली. या दुर्घटनेत सरनाईक कुटुंबाचे संपूर्ण घर जळून खाक झाले. घरातील रोख रक्कम, जीवनावश्यक साहित्य आणि संसारोपयोगी वस्तू पूर्णपणे जळून गेल्याने कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यामुळे कुटुंबासमोर एक वेळच्या जेवणाचाही मोठा प्रश्न उभा राहिला होता. सरनाईक कुटुंबाची ही व्यथा आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका लोणकर यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तत्काळ या पीडित कुटुंबाला मदतीचा हात दिला.
कुटुंबाला काही रोख रक्कम देण्यात आली. याच कुटुंबातील विद्यार्थी सार्थक लक्ष्मणराव सरनाईक याचा पुढील दोन वर्षांचा शैक्षणिक खर्च शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. लोणकर यांनी उचलण्याची जबाबदारी घेतली आहे. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शाळेने केलेल्या या मदतीमुळे सरनाईक कुटुंबाच्या डोक्यावरील आर्थिक आणि शैक्षणिक चिंतेचे मोठे ओझे कमी झाले आहे. समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपूनशिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिराने इतरांसाठी एक उत्तम आदर्श घालून दिला आहे.अशी चांगली कामे करणाऱ्या आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिराचे खूप कौतुक होत आहे.