महासचिवाच्या राजीनाम्याने काँग्रेसमध्ये खळबळ

07 Nov 2025 21:37:15
दर्यापूर, 
general-secretarys-resignation : पालिका निवडणूक तथा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला कोणतेही बळ न देणार्‍या काँग्रेसच्या वरिष्ठांच्या विरोधात दंड थोपटून दर्यापूरमध्ये बहूचर्चित व्यक्तिमत्व असलेल्या अजय ब्रदिया वसू यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा देत पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले असून काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
 
 

amt 
 
 
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवत अजय बद्रिया (वसू) यांनी अमरावती जिल्हा महासचिव या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठीकडे सादर केला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र काँग्रेस जिल्हा अध्यक्षांकडे दिल्याची माहिती मिळाली आहे. अजय ब्रदिया हे दर्यापूरमधील बहूचर्चित व्यक्तिमत्व आहे. अनेक गणेश मंडळ तथा दुर्गा मंडळाचे अध्यक्ष राहिले असून कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांनी निर्माण केली आहे; यांसह आनेक गरीब गरजू लोकांना रुग्णलयीन मदत, शैक्षणिक मदत देत अनेकांच्या हृदयात स्थान बनविले आहे. वसू बिल्डर आणि डेव्हलपर्सचे ते संचालक आहेत व अनेक समाजसेवी संस्थांशी जुळले आहेत.
 
 
त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस जिल्हा संघटनेत चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. अजय बद्रिया यांनी राजीनाम्यामागील कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले असून, त्यांनी पक्षावरील आपली निष्ठा कायम राहील, असेही स्पष्ट केले आहे. मात्र, या निर्णयामुळे पुढील काही दिवसांत अमरावती जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वैयक्तिक कारणासाठी मी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महासचिव पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करीत आहे. पुढील काळात इतर कोणत्या पक्षात जाण्याचा अजून विचार केलेला नाही. सद्य स्थितीत मी काँग्रेस पक्षातच एक साधा कार्यकर्ता म्हणून राहणार आहे, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
Powered By Sangraha 9.0