दर्यापूर,
pushpendra-kulshrestha : भारताने प्राचीन काळापासून जगाला मार्गदर्शन केले आहे, आजही अनेक देश भारतीयांच्या परंपरेचा अभ्यास करीत त्यांच्या देशात बदल घडवत आहेत. सनातन धर्मच सर्वात जुना धर्म असून संपूर्ण जगात शांतता नांदवण्याची क्षमता केवळ भारतीय संस्कृतीत आहे. धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे तर ते जगण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी दर्यापुरात व्याख्यानात मार्गदर्शन करताना केले.
सकल हिंदू समाज मंचाच्या वतीने गुरूवारी सायंकाळी दर्यापुरातील स्वातंत्र्य सेनानी वा. का. धर्माधिकारी जि. प. कन्या शाळेच्या प्रांगणात पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रदीप मलिये व सागर महाराज परिहार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक शर्मा तर संचालन अॅड अजिंक्य धर्माधिकारी यांनी केले.
कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, आपल्या देशाने गेल्या काही वर्षात अनेक बदल अनुभवले आहेत. ते बदल राज्यकर्त्यांनी केले नसून जनतेच्या माध्यमातून झाले आहेत. जगातील सगळे धर्म हे एक सारखे असू शकत नाहीत, प्रत्येक धर्माचा वेगळा विचार आहे, मात्र भारतीय संस्कृती व भारतीय परंपरा संपूर्ण जगात आपला वेगळा ठसा उमटवत भारताला श्रेष्ठ बनवत आहे. भारतीय संविधानाच्या बाबतीत काही लोक फेक नेरेटिव्ह तयार करीत संभ्रम निर्माण करत आहेत.
हा डाव उधळून लावण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांची आहे. सत्य काय आहे हे आजकाल कॉम्प्युटरच्या काळात आपण जाणून घेऊ शकतो. यासह पुरातन पुस्तकांचे वाचन केल्यास सत्य आपल्या डोळ्यापुढे येऊ शकते; मात्र केवळ सोशल मीडियावर अवलंबून असणाऱे भारतीय लोक वाचन संस्कृती विसरले आहे. यामुळे खरा इतिहास आपल्यापासून लपवल्या जात आहे. अशा षड्यंत्रापासून भारतीय लोकांनी सावध राहावे, असे ज्येष्ठ व्याख्याते पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी व्याख्यानादरम्यान सांगितले आयोजित व्याख्यानाला महिलांसह पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मंचावरील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. कार्यक्रमाची सांगता शिव वंदना स्तुतीने करण्यात आली.