अमरावती,
aniruddha-deshpande : भारतीय महिला क्रीकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने आपल्या टीममेटसह जेव्हा विश्वचषक उंचावला तेव्हा तो क्षण फक्त एक विश्वविजयाचा नव्हता, त्या एका क्षणात अनेकांची स्वप्नपूर्ती झाली आणि अनेकांच्या पंखांना नवे बळ मिळाले. महिला क्रिकेट संघाला उत्कृष्ठ खेळाची दाद मिळत असताना पडद्यामागील रणनिती आणि नियोजन करणारे शिल्पकार यांचाही या विजयामध्ये तेवढाच मोठा वाटा आहे. समस्त अमरावतीकरांकरीता गौरवाची बाब म्हणजे, या विश्वचषक विजयामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा एमसीएचा विद्यार्थी व क्रिकेटपटू अनिरूद्ध देशपांडे यांनी संघाचा ’परफॉर्मर अनॅलिस्ट’ म्हणून विश्व विजयामध्ये महत्वपूर्ण व मोलाची भूमिका पार पाडली.

अंबिका नगर येथील रहिवाशी अनिरूद्ध देशपांडे याने लहानपणापासून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षक डॉ. दिनानाथ नवाथे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीकेटमध्ये प्राविण्य प्राप्त करीत अनिरुद्धने १९ वर्षाखालील अखिल भारतीय कुचबेहर चषक २००६ मध्ये विदर्भांचे प्रतिनिधित्व केले होते. याच क्रीकेट क्षेत्रात भवितव्य घडविण्याकरिता अनिरूद्धने विदर्भ रणजी संघासाठी १४ वर्षांपासून व्हिडीओ विश्लेषण केले.
अनिरूद्ध यांचा व्हिडीओ अनॅलिस्ट, डाटा, रणनिती, विरोधी खेळाडूंच्या कमजोरी, खेळण्यातील बारकावे आदी अनुभव लक्षात घेत मागील वर्षापासून भारतीय महिला क्रीकेट संघाच्या ’परफॉर्मर अनॅलिस्ट’ म्हणून तो कार्य करीत आहे. महिला क्रिकेट विश्वचषक मध्ये भारतीय संघाला योग्य माहिती देत विजयाचे शिल्पकार घडविणारा अनिरूद्ध देशपांडे यांच्या यशस्वी कामगीरीचे क्रीकेट जगातामध्ये प्रशंसा होत आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, सचिव माधुरी चेंडके, हव्याप्र मंडळाचे क्रिकेट प्रशिक्षक डॉ. दिनानाथ नवाथे यांच्यासह जिल्हा हौशी क्रीकेट संघटना पदाधिकारी व समस्त अमरावतीकरांनी त्याचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे.
//अनिरुद्धचा अभिमान : पद्मश्री वैद्य
भारतीय महिला क्रीकेट संघाने विश्वकप जिंकल्याचा आनंद! पण त्यापेक्षाही या विजयामध्ये श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा खेळाडू अनिरूद्ध देशपांडे यांची मोलाची व निर्णायक भुमिका महत्वाची ठरली याचा सार्थ अभिमान असल्याचे मत अमरावती जिल्हा हौशी क्रीकेट संघटनेचे अध्यक्ष व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी व्यक्त केले.