नवी दिल्ली,
Dhirendra Shastri's march for Hindu unity बागेश्वर धामचे मुख्य पुजारी आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी शुक्रवारपासून १० दिवसांच्या भव्य पदयात्रेला सुरुवात केली आहे. ७ नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही पदयात्रा १६ नोव्हेंबरपर्यंत दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विविध भागांमधून जाणार आहे. सुमारे १४५ किलोमीटरचा प्रवास करणारी ही यात्रा हिंदू समाजात ऐक्य, जातीय भेदभावाचा अंत आणि राष्ट्रभक्तीचा संदेश पसरवण्याच्या उद्देशाने काढली जात आहे. “ही आमच्या आयुष्यातील दुसरी पदयात्रा आहे. आम्हाला कोणत्याही धर्माचा विरोध नाही, परंतु हिंदूंमध्ये एकता निर्माण व्हावी अशी आमची इच्छा आहे. आम्हाला जातीवाद नको, तर राष्ट्रवाद हवा आहे. ही यात्रा हिंदूंच्या समर्थनार्थ आहे, मुस्लिमांच्या विरोधात नाही.

ते पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक हिंदू सुरक्षित राहावा, कोणत्याही प्रकारचा दंगलवाद किंवा इस्लामीकरण वाढू नये, यासाठी ही पदयात्रा सुरू केली आहे. देश सर्वांचा आहे, पण हिंदूंनी आपली एकता टिकवून ठेवली पाहिजे. जर जाती संघर्ष संपले, तर हिंदू एकत्र येतील आणि देश अधिक मजबूत बनेल. बाबा बागेश्वर यांनी सांगितले की, प्रत्येक दिवसाची सुरुवात राष्ट्रगीत आणि हनुमान चालीसा या पठणाने होईल. तसेच दररोज सात शपथा घेतल्या जातील. या पदयात्रेत आतापर्यंत ४० हजारांहून अधिक यात्रेकरूंनी नोंदणी केली असून देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक यात सहभागी होत आहेत.
त्यांनी सांगितले की, आमचे ध्येय केवळ हिंदू एकता आणि सनातन मूल्यांची जपणूक आहे. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, तर आपल्या संस्कृतीच्या समर्थनार्थ उभे आहोत. ज्यांना हिंदुत्व, सनातन आणि तिरंग्याशी प्रेम आहे, ते सर्व या यात्रेत सहभागी होत आहेत. शेवटी आचार्य शास्त्री म्हणाले की, या पदयात्रेसाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना पत्र पाठवून निमंत्रण देण्यात आले आहे. ते म्हणाले, ज्यांना हिंदुत्व आणि राष्ट्रभावना आपल्या हृदयात जपायची आहे, त्यांचे या यात्रेत स्वागत आहे. आमचे उद्दिष्ट विभाजन नव्हे, तर एकता आणि भक्ती आहे.