ब्रिटनमध्ये विद्यार्थ्यांना मिळणार फेक न्यूज ओळखण्याचे प्रशिक्षण

07 Nov 2025 10:11:24
लंडन,
Fake news training डिजिटल युगात फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने ब्रिटन सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. नागरिकांना, विशेषतः तरुण पिढीला, सत्य आणि असत्यामधील फरक ओळखता यावा यासाठी ब्रिटन आपल्या शालेय शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार आहे. २०२८ पासून लागू होणाऱ्या नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना फेक न्यूज म्हणजे काय, ती कशी पसरते आणि ती ओळखण्याचे प्रभावी मार्ग याबद्दल सविस्तर शिक्षण दिलं जाणार आहे. या उपक्रमाद्वारे मुलांना माहितीवर प्रश्न विचारण्याची सवय लागावी, सत्य पडताळून पाहण्याची वृत्ती निर्माण व्हावी आणि डिजिटल जगात जबाबदारीने वावरण्याची जाणीव व्हावी, हा सरकारचा उद्देश आहे.
 
fake news
 
 
ही नवी योजना ब्रिटन सरकारच्या ‘प्लॅन फॉर चेंज’ या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. या योजनेत डिजिटल जबाबदारी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), नागरी जाणीव आणि हवामान शिक्षण अशा विषयांचा समावेश करण्यात आला आहे. शिक्षणमंत्री ब्रिजिट फिलिप्सन यांनी सांगितले की, आता मुलांनी केवळ पुस्तकांमधूनच नव्हे तर जगातून शिकण्याची वेळ आली आहे. फेक न्यूज आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या युगात सत्य आणि खोटं यामधला फरक ओळखण्याची क्षमता मुलांमध्ये असणे अत्यावश्यक आहे.
 
 
या अभ्यासक्रमात नागरी शिक्षण अधिक बळकट करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक होण्यासाठी प्रेरित केले जाईल. त्याचबरोबर शाळांमधील परीक्षा प्रणालीत सुधारणा करून विद्यार्थ्यांवरील ताण १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. शिक्षणात संतुलन आणण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. नव्या अभ्यासक्रमात आर्थिक साक्षरतेलाही प्राधान्य दिलं जाणार आहे. मुलांना पैशांचं व्यवस्थापन, कर्ज टाळण्याचे मार्ग आणि जबाबदार आर्थिक निर्णय घेण्याचं शिक्षण दिलं जाईल. त्याचबरोबर प्राथमिक स्तरावरच चुकीची माहिती आणि अफवा ओळखण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. ब्रिटन सरकारच्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार असून, भावी पिढी अधिक सजग, जबाबदार आणि सत्यनिष्ठ नागरिक म्हणून तयार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0