आणि ती पोलिसांनी तत्परतेने सुखरूप घरी पोहोचविली

07 Nov 2025 20:18:57
हिंगणघाट, 
hinganghat-missing : येथील पोलिस स्टेशनला काल ७ रोजी रात्री घाबरलेल्या अवस्थेतील कुटुंबाने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी तत्परतेने तपास करीत बेपत्ता अल्पवयीन युवतीला सिकंदराबाद येथून ताब्यात घेत तिच्या आई-बापाच्या सुपूर्द करून सुटकेचा निश्वास घेतला.
 
 
missing
 
 
 
ठाणेदार अनिल राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी येथील एका खासगी शिकवणी वर्गाला अल्पवयीन मुलगी घरून निघाली. ती शिकवणी वर्गात आली. या वर्गात एका विषयाची टेस्ट होती ती देऊन ती घरी जाण्या ऐवजी थेट रेल्वे स्टेशनवर गेली. त्या ठिकाणी हैद्राबादकडे जाणार्‍या गाडीत बसली. इकडे पोलिसात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होताच पोलिसांनी लगेचच तपासाला सुरुवात केली. शिकवणी वर्गापासून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. विविध ठिकाणी असलेल्या सीसी टिव्ही कॅमेर्‍याच्या मदतीने पोलिसांनी बेपत्ता मुलीचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली.
 
 
ती मुलगी रेल्वेस्टेशनवर पोहोचली. सायकल बाहेर ठेऊन ती रेल्वे स्टेशनात जाऊन समोर उभी असलेल्या गाडीत बसली. मग पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशन वरून तिचा माग घेणे सुरू केले. मुलगी आपला मोबाईल स्विच ऑफ करून वॉट्स उपवरून कोणाशी तरी चॅट करीत असल्याचे आढळून आले. हिंगणघाट पोलिसांनी तात्काळ येथून पथक सिकंदराबादच्या दिशेने रवाना केले. युवतीला नाट्यमय रित्या ताब्यात घेतले. त्यावेळी ती मुलगीही क्षणभर चकित झाली. पोलिसांनी तिला हिंगणघाट पोलिसात आणून तिचा बयाण नोंदवून घेत तिला तिच्या पालकांच्या सुपूर्द केले. पोलिसांनी वेळीच तडफेने कारवाई केल्याने एक अल्पवयीन मुलगी एका मोठ्या संकटातून बचावली.
Powered By Sangraha 9.0