सिलीगुडी,
India bases on Bangladesh border ईशान्य भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारताने एक मोठे आणि धोरणात्मक पाऊल उचलले आहे. सिलीगुडी कॉरिडॉरवरील सुरक्षा बळकावण्यासाठी भारतीय लष्कराने तीन नवे लष्करी तळ उभारले आहेत. हे तळ बामुनी, किशनगंज आणि चोप्रा येथे स्थापन करण्यात आले असून ते सर्व बांगलादेश सीमेजवळील अत्यंत संवेदनशील भागात आहेत. या निर्णयामागे अलीकडेच वाढलेली पाकिस्तान-बांगलादेश लष्करी जवळीक ही एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमिटीचे प्रमुख जनरल साहिर शमशाद मिर्झा आठ सदस्यीय प्रतिनिधीमंडळासह बांगलादेशात पोहोचले. त्यांच्या या भेटीदरम्यान बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांच्यासह लष्करी सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. इतकेच नव्हे, तर मिर्झा यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचीही भेट घेतली.

यावेळी युनूस यांनी त्यांना “द आर्ट ऑफ ट्रायम्फ” हे पुस्तक भेट दिले, ज्याच्या मुखपृष्ठावर भारताच्या ईशान्येकडील काही भागांना बांगलादेशाचा भाग म्हणून दर्शविणारा नकाशा होता. या घटनेमुळे बांगलादेशभर संताप उसळला असून भारतातही याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. सिलीगुडी कॉरिडॉर हा भारताच्या मुख्य भूभागाला ईशान्येकडील सात राज्यांशी जोडणारा अरुंद पट्टा आहे. या भूभागाला ‘चिकन नेक’ असे म्हटले जाते कारण काही ठिकाणी तो फक्त २१ किलोमीटर रुंद आहे. हा पट्टा नेपाळ, भूतान आणि बांगलादेशला लागून असल्याने सुरक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या भागात नवे लष्करी तळ उभारल्याने भारताने सीमासुरक्षेचा पाया अधिक मजबूत केला आहे.
लष्करी सूत्रांच्या माहितीनुसार, या तळांमुळे असुरक्षित क्षेत्रांवर अधिक बारकाईने नजर ठेवता येईल तसेच संकटाच्या काळात सैन्याला जलद प्रतिसाद देणे सुलभ होईल. हे तळ गुप्तचर आणि देखरेखीच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणार आहेत. दरम्यान, बांगलादेशने सिलीगुडी कॉरिडॉरला लागून असलेल्या लालमोनिरहाट एअरबेसला पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. ब्रिटिश काळात उभारलेला हा एअरबेस अनेक वर्षे निष्क्रिय होता. मात्र, अलीकडेच जनरल वकार-उझ-जमान यांनी या तळाची पाहणी केली असून, येथे लढाऊ विमानांसाठी मोठा हँगर तयार करण्यात येत आहे. या निर्णयामागे चीनचा प्रभाव असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. कारण बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मोहम्मद युनूस मार्च महिन्यात चीनला भेटले होते आणि त्यांनी बीजिंगमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. भारताने उभारलेल्या या नव्या लष्करी तळांमुळे ईशान्येकडील सीमावर्ती भागात सुरक्षेचा बळकट कवच तयार झाले असून, पाकिस्तान-बांगलादेश-चीन या त्रिकोणी हालचालींना भारताने दिलेला हा रणनीतिक इशारा मानला जात आहे.