महाविकास आघाडी म्हणूनच लढू न.प. व नगर पंचायतीची निवडणूक

07 Nov 2025 19:23:57
चंद्रपूर, 
vijay-wadettiwar : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघता आघाडीचा निर्णय घ्यावा असे ठरले असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढायचे ठरले आहे. मित्र पक्षांची जागांच्या वाटाघाटी सुरू आहेत. दरम्यान, काँगे्रसच्या ईच्छुक उमेदवारांच्या शुक्रवारी चंद्रपुरात मुलाखती झाल्या. सर्वत्र चांगला प्रतिसाद आहे, अशी माहिती राज्याचे विरोध पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
 
 
vaddetivar
 
यावेळी मंचावर खासदार प्रतिभा धानोरकर, काँगे्रसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, निवडणूक प्रभारी आ. अभिजित वंजारी आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, चंद्रपूर जिल्हयात होऊ घातलेल्या 10 नगर परिषद व 1 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी काँगे्रस पक्षाकडून निवडणूक लढू ईच्छिणार्‍या उमदेवारांच्या मुलाखती पार पडल्या. नगराध्यक्ष पदासाठी कुठे दोन, कुठे चार, तर कुठे सहा-सात ईच्छूकांनी मुलाखती दिल्याचे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.
 
 
युतीमध्ये कुणाचा पायपोस कुणाला नाही. उर्वरित दोन घटक पक्षांना भाजपा गिळंकृत करेल की काय, अशी स्थिती आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला. उलट काँगे्रस आपल्या मित्र पक्षांना घेऊन चालत आहे. स्थानिक नेत्यांशी चर्चा झाली आहे. दोन-तीन दिवसांत जागा वाटपाचे ठरेल. राज्य काँगे्रसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक येत्या 11 किंवा 12 तारखेला होईल आणि त्यात आम्ही आमचे उमदेवार निश्चित करू, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, सुभाष धोटे, आ. अभिजित वंजारी, खा. प्रतिभा धोनोरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
पार्थ पवार जमिनी प्रकरणी अडकणारः वडेट्टीवार
 
 
कोरेगाव पार्क येथील 40 एकर जागा गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार अडणार आहेत. कारण 99 टक्के भागभांडवल त्यांचे आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी लावला.
Powered By Sangraha 9.0