9 नोव्हेंबरला नशामुक्तीसाठी धावणार वर्धेकर

07 Nov 2025 20:12:40
वर्धा, 
nasha-mukti : तरुण व्यसनाधीन झाले आहेत. व्यसनामुळे या तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना नशामुत भारतासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या वतीने जनजागृतीसाठी देशभरात रविवार ९ रोजी ‘रन फॉर हेल्थ मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. वर्धेतही पुरुष आणि महिलांची मॅरेथॉन आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून नशामुतीचा संदेश देण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाचे जिल्हा संयोजक महेश राऊत यांनी आज शुक्रवार ७ रोजी स्थानिक साई मंदिरात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
 j
 
महेश राऊत पुढे म्हणाले की, देशातील तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे. त्यामुळे बजरंग दलाच्या वतीने देशभरात नशामुत अभियान राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून रन फॉर हेल्थ (मॅरेथॉन)चे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन १४ ते ४० वयोगटातील पुरुष आणि महिला या दोन गटात आयोजित आहे. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल कोड देण्यात आला असून तो कोड स्कॅन करून नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत १५० च्या जवळपास ऑनलाईन नोंदणी झाली आहे. ही मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी ६ वाजता सुरू होणार असून सोशालिस्ट चौक, वंजारी चौक, आर्वी नाका ते परत शिवाजी चौकात येणार आहे. प्रत्येक पॉइंटवर पाणी आणि एनर्जी ड्रिंकची व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छूक स्पर्धक प्रत्यक्ष सहभाग नोंदणी करू शकणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.
 
 
या मॅरेथॉनमध्ये प्रशासकीय अधिकार्‍यांसह साधू-संतांचीही उपस्थिती राहणार आहे. मॅनेथॉनमध्ये प्रथम, द्बितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणार्‍या महिला-पुरुष गटासाठी रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. वर्धेकरांनी या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राऊत यांनी केले. पत्रकार परिषदेला बजरंग दलाचे जिल्हा प्रभारी मुन्ना यादव, जिल्हा विद्यार्थी प्रमुख अंबुज पांडे, दुर्गा वाहिनीच्या जिल्हा संयोजक पुनम भोयर, नगर संयोजक अ‍ॅड. स्वाती दोडके यांची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0