मुंबई,
Sulakshana Pandit passes away प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले. त्या मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप जाहीर केलेले नाही, परंतु काही काळापासून त्या आजारी होत्या, असे वृत्त आहे. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपट आणि संगीत क्षेत्रासह लाखो चाहत्यांना दु:खाचे वातावरण निर्माण झाले असून, सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.
सुलक्षणा पंडित यांचा जन्म १९५४ मध्ये एका अत्यंत प्रतिष्ठित संगीत कुटुंबात झाला. त्या दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची होत्या. त्यांच्या भावंडांमध्ये जतिन आणि ललित या जोडीने बॉलिवूडमध्ये संगीतकार म्हणून स्वतःची विशेष ओळख निर्माण केली. सुलक्षणा यांनी वयाच्या नवव्या वर्षी संगीत प्रवासाची सुरुवात केली आणि १९६७ मध्ये पार्श्वगायनात प्रवेश केला. १९७५ च्या "संकल्प" चित्रपटातील "तू ही सागर है तू ही किनारा" या गाण्यासाठी त्यांना प्रतिष्ठित फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गायनाबरोबरच, सुलक्षणा पंडितने अभिनय क्षेत्रातही आपली छाप सोडली. १९७० आणि १९८० च्या दशकात त्या चित्रपटसृष्टीत सक्रिय होत्या. त्यांच्या काही उल्लेखनीय चित्रपटांमध्ये "उलझन" (१९७५) आणि "संकोच" (१९७६) यांचा समावेश आहे. अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपली कारकीर्द भरभराटीला नेली, परंतु वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींमुळे त्यांना काही काळ संघर्ष करावा लागला. त्यांनी कधीही विवाह केला नाही.