पुलगाव,
avinash-bhope : वंदे मातरम् गीताने देशातील जनतेमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागृत करून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी मोलाचे योगदान दिले. देशाला मातृभूमी म्हणून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान अनेक नरवीरांनी केले. वंदे मातरम्च्या घोषणेने क्रांती व अहिंसा दोन्ही चळवळीला बळ मिळाले. वंदे मातरम्पासून प्रेरणा घेऊन देशाला सुजलाम सुफलाम करण्याचा संकल्प करू या असे आवाहन तरुण भारतचे पुलगाव प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अविनाश भोपे यांनी केले.
वंदे मातरम् सार्ध शताब्दी दिनानिमित्त स्थानिक रंगलाल केजडीवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था व कौशल विकास विभागाच्या वतीने आज ७ रोजी आयोजित कार्यक्रमांत प्रमुख वते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार समर्थ क्षीरसागर होते. व्यासपिठावर रंगलाल केजरीवाल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य माया वंडलकर, कौशल विकास समितीचे सदस्य सागर कपूर, वंदे मातरम सार्ध शताब्दी तालुका समितीचे सदस्य दिलीप घालणी, निरज ढगे, सागर पेरके, विनोद सावसाकडे, सुबोध चचाणे आदी उपस्थित होते.
तहसीलदार समर्थ क्षिरसागर यांनी वंदे मातरम गीतामध्ये भारत मातेचे सुंदर वर्णन असून देशाला मातेचे स्वरूप देण्याचे कार्य केले. त्यामुळे विविध माध्यमातून कार्य करून भारत मातेची सेवा करण्याचे कार्य करू असे आवाहन केले.
प्रास्ताविक प्राचार्य संजय कोपुलवार यांनी केले. आर के हायस्कूलच्या विद्यार्थिनी यांनी सुंदर सुगम स्वर व चालीमध्ये गायन केले. रिद्धी भांडे व वर्षा बाभळे यांनी वंदेमातरमला संगीतबद्ध केले.आर. के. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीताचे महत्त्व विशद करणारी लघुनाटिका सादर केली. संचालन प्रशांत पांडे यांनी केले तर आभार शंकर उईके यांनी मानले. कार्यक्रमांमध्ये पुलगाव शहरातील सर्व विद्यालय सहभागी झाले होते.