वर्धा,
wardha-news : वाढत्या थंडीसोबत जिल्ह्यात नगर पालिकांच्या निवडणुकींमुळे गर्मी वाढत आहे. नगर पालिका निवडणुकीकरिता १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. उद्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यातील ६ नगर पालिकांसाठी नगरसेवकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्यातील १६६ जागांकरिता ६०८ इच्छूक आहेत.
जिल्ह्यातील ६ नगर पालिकेत होत असलेल्या या निवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी याकरिता अनेक इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत. नगरसेवकांच्या मुलाखतीला आज ८ नोव्हेंरपासून प्रारंभ झाला. वर्धेत आ. सुमीत वानखेडे आणि आर्वीचे माजी नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे यांनी मुलाखती घेतल्या. हिंगणघाट येथे माजी खासदार रामदास तडस, अशोक कलोडे, कमलाकर निंभोरकर, राहुल चोपडा यांनी मुलाखतीची जबाबदारी पार पाडली. आर्वी येथे आ. समीर कुणावार, श्रीधर देशमुख, अर्चना वानखेडे, वैशाली येरावार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. देवळीत आ. दादाराव केचे, अविनाश देव, सिंदीत आ. राजेश बकाने, भुपेंद्र शहाने आणि पुलगाव पालिकेची जबाबदारी भाजपाचे माजी अध्यक्ष सुनील गफाट आणि माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी पार पाडली. इच्छूकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी देताना पक्ष श्रेष्ठींचा कस लागणार आहे. यातून राजीनाराजी पुढे येण्याची शयता आहे.
नगराध्यक्षाकरिता ६२ अर्ज
जिल्ह्यात सहा नगराध्यक्षांकरिता होत असलेल्या निवडणुकीकरिता अध्यक्षपदाकरिता इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यासाठी उद्या शनिवार ८ रोजी मुलाखती होणार आहेत. वर्धेत ६, देवळी ५, पुलगाव ५, सिंदी रेल्वे ६, हिंगणघाट १६ आणि आर्वी पालिकेच्या अध्यक्षाकरिता तब्बल २४ इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत.