किंग्स्टन,
Melissa कॅरिबियन समुद्रातील देशांवर धडकलेल्या ‘मेलिसा’ या चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवला आहे. शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून लाखो नागरिक बेघर झाले आहेत. या गंभीर परिस्थितीत भारताने पुढे येत मानवीय मदतीचा हात दिला आहे. भारताच्या या तत्पर आणि व्यापक मदतीबद्दल क्यूबा आणि जमैका या दोन्ही देशांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
भारत सरकारने क्यूबा आणि जमैका या दोन्ही देशांना वैद्यकीय मदत, आवश्यक औषधे, वीज जनरेटर, तंबू, खाट, स्वयंपाकघर आणि स्वच्छता किट तसेच BHISHM मेडिकल ट्रॉमा युनिट या अत्याधुनिक वैद्यकीय युनिटसह २० टनांहून अधिक मदतसाहित्य पाठवले. भारतीय वायुदलाच्या विशेष विमानांनी ही मदत हवाना आणि किंग्स्टन येथे पोहोचवली.भारतामधील क्यूबाचे राजदूत यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सामाजिक माध्यमावर लिहिले की, “भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला, वायुदलाला, सरकारला आणि जनतेला आम्ही मनःपूर्वक धन्यवाद देतो. भारताने पाठवलेले दोन *BHISHM हॉस्पिटल युनिट्स* आणि आवश्यक साहित्य हे खऱ्या अर्थाने मैत्रीचे प्रतीक आहे.” भारतीय दूतावासानेही या मदतीचा तपशील देताना सांगितले की, “वसुधैव कुटुंबकम् या भावनेतून भारत क्यूबाच्या लोकांसोबत उभा आहे.”
जमैका येथील परराष्ट्र मंत्री Melissa कामिना जॉन्सन स्मिथ यांनी आपल्या संदेशात भारताचे कौतुक करताना म्हटले, “वसुधैव कुटुंबकम् ही भारताची केवळ G-20 परिषद थीम नव्हती, तर ‘साउथ-साउथ को-ऑपरेशन’चा खरा आत्मा आहे. भारताने सोलर लॅम्प, जनरेटर, BHISHM मॉड्युलर ट्रॉमा किट, पूरग्रस्त भागांसाठी रिमोट कंट्रोल डिलिव्हरी सिस्टीम आणि महिलांसाठी विशेष स्वच्छता किट पाठवले आहे. हे केवळ मदत नाही, तर मानवी संवेदनांचा खरा प्रत्यय आहे.”त्यांनी पुढे लिहिले, “भारतीय वैद्यकीय पथक आमच्यासोबत काही दिवस राहून नव्या उपकरणांचे प्रशिक्षण देईल. ‘वॅक्सीन मैत्री’ मोहिमेप्रमाणे ही मदतही आम्ही कायम लक्षात ठेवू.” या संदेशाला प्रत्युत्तर देताना भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी लिहिले, “आपल्या सदिच्छांसाठी धन्यवाद. या कठीण प्रसंगी भारत जमैकाच्या जनतेसोबत आहे आणि सदैव राहील.”
‘मेलिसा’ हे गेल्या १५० Melissa वर्षांतील कॅरिबियन प्रदेशातील सर्वात भयानक चक्रीवादळ ठरले आहे. जमैका, क्यूबा आणि हैती या देशांत भीषण पूर आणि भूस्खलनामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली. पश्चिम जमैकामध्ये तब्बल ५० लाख मेट्रिक टन मलबा साचल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. जमैकाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा सुमारे ३० टक्के भाग या आपत्तीत नष्ट झाला आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते, लाखो लोक अजूनही मदतीची वाट पाहत आहेत. अशा वेळी भारताने केलेल्या जलद आणि व्यापक मदतीने या देशांच्या नागरिकांच्या मनात भारताबद्दल कृतज्ञतेची भावना निर्माण केली आहे. वसुधैव कुटुंबकम् – ‘संपूर्ण जग एक कुटुंब’ – या तत्त्वाची साक्ष भारताने पुन्हा एकदा कृतीतून दिली आहे.