तळेगाव (श्या.पंत),
ashti-upsa-irrigation-project : पाण्याची तीव्र टंचाई, शेतीसाठी सिंचनाचा कोणताही स्त्रोत नाही आणि त्यामुळे हलाखीचे जीवन जगणार्या आष्टी तालुयाला आ. सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांनी ७३ कोटी १९ लाख रुपये खर्चाच्या महत्त्वाकांक्षी आष्टी उपसा सिंचन प्रकल्पाच्या (आष्टी लिफ्ट इरिगेशन) निविदा अखेर प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आष्टी परिसरातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार असून शेतकर्यांचे जीवनमान उंचावणार आहे.

आष्टी तालुक्यातील आष्टी, थार, किन्ही, करोला, बोरखेडी, चामला, नागाझरी, वाडी, बांबर्डा, वाघोडा व बोटोणा या गावांना बारमाही सिंचन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत वानखेडे यांनी दिले होते. या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची गंभीर समस्या होती. विशेषतः दिवाळीनंतर जनावरांसाठी पिण्याचे पाणी शोधणेही कठीण होई तर शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान होत असे. पाण्याअभावी येथील नागरिकांना स्थलांतरसुद्धा करावे लागत होते. या भागातील नागरिक सातत्याने पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी छोटे धरण किंवा मोठा तलाव बांधण्याची आग्रहाची मागणी करत होते. याची दखल घेत आ. वानखेडे यांनी आष्टी उपसा सिंचन योजनेच्या प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले. प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याची फलश्रृती म्हणून एक वर्षाच्या आत संपूर्ण प्रक्रियेला मान्यता देत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या निविदेला मंजुरी देण्यात आली.
या योजनेमुळे लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतीत बारमाही पाणी उपलब्ध होणार आहे. आ. सुमित वानखेडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.