गोंदिया,
attempt-to-grab-land : खोट्या कागदपत्रांच्या आधारावर तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमीन हडपण्याचा प्रकार फुलचूरटोला ग्रामपंचायत हद्दितील सेलटॅक्स कॉलनी येथे पुढे आला असून याची तक्रार मनोरमा राहुलकर यांनी प्रशासनाकडे केली.
सेलटॅक्स कॉलोनी येथे राहणाऱ्या मनोरमा राहुलकर यांनी शुक्रवार ७ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पतीच्या नावे आणि ननंदेच्या नावे सेलटॅक्स कॉलनी येथे वडिलोपार्जीत एक एकर जमीन भूमापन क्रमांक व उपविभाग ९३/१ (क्षेत्र ०.४०.०० आर) आहे. या जमिनीच्या सातबारावर त्यांच्या कुटुंबातील सहा लोकांची नावे आहेत. त्यामध्ये कोणताही फेरफार केलेला नाही.
त्यातच मनोरमा राहुलकर यांच्या मोठ्या मुलाचे निधन झाले. त्याची पत्नी मंगला राहुलकर हिने जून २०२४ मध्ये नंनद यांच्या नावाने खोटी नोटरी करून जमीन हडपण्याचा प्रयत्न केला. तसेच मंगला राहुलकर हिने तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याच्या सहकार्याने सातबारावर ती जागा आपल्या नावे केली. तलाठ्याने एका दिवसातच सातबारावर फेरफार करून तुम्ही लवकरात लवकर ही जमीन विकून टाका नाहीतर तुमच्या घरचे लोक यावर आक्षेप उचलतील, असे मंगला राहुलकर यांना सांगितले. या संपूर्ण प्रकरणात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असून तातडीने त्या जमिनीच्या व्यवहारात हस्तक्षेप करून कारवाई थांबविण्यात यावी, अशी तक्रार मनोरमा राहुलकर यांनी प्रशासनाकडे केली असल्याचे सांगितले.