प्रत्येकाला आनंदाने जगण्याचा अधिकार

09 Nov 2025 21:13:37
अमरावती, 
bhaiyyaji-joshi : प्रत्येक माणसाला आनंदाने जगण्याचा अधिकार आहे, मग तो दुर्बल असो वा सक्षम असो की गरीब वा श्रीमंत असो. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार स्वतः आनंद घ्यावा व इतरांनाही आनंदी ठेवावे. दुर्बल घटकांना सक्षम घटकांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहन रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी केले.
 
 
k
 
पारधी विकास फाऊंडेशनद्वारा संचालित विदर्भ प्रांत पारधी विकास परिषदेच्यावतीने पारधी समाजासाठी काम करणार्‍या संस्थांची एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच रवी भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून अनु.जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम उपस्थित होते. पारधी विकास परिषदेचे मार्गदर्शक प्रदीप वडनेरकर, संयोजक आशिष कावळे, पारधी विकास परिषदेचे अध्यक्ष परशराम भोसले व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना भैय्याजी म्हणाले, शिक्षित व अशिक्षित दोघेही पैसा मिळवू शकतात पण पैसे मिळविण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. जसा शिक्षित आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर इतरांना फसवून ही पैसा मिळवू शकतो व आनंद घेवू शकतो पण अशिक्षित मोलमजूरी, कष्ट करूनही अर्थाजन करून आनंद मिळवू शकतो. हे आनंद मिळविण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात. या दोन्हीही गोष्टींसाठी बुद्धीमत्ता व कौशल्य लागते. तुम्ही जन्म कुठे घेतला, कोणत्या जातीत, धर्मात घेतला यावर काहीही अवलंबून नसते. मात्र, प्रत्येकाने योग्य मार्गाने चालावे असे ईश्वराचे वरदान आहे. आता जगण्यासाठी सर्व व्यवस्था निर्माण झाल्या आहेत. सर्व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेवून दुर्बल व वंचित घटकातील पारधी समाजास उन्नत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
 
 
धर्मपाल मेश्राम म्हणाले, मला शासनाने वंचित समाजासाठी काम करण्याची संधी दिली. मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो, अगदी शेवटच्या पालावर व बेड्यात गेलो. अजूनही शेवटच्या घटकांपर्यंत शासनाचे लाभ पोहोचले नाहीत. अद्यापही पारधी समाजाची स्थिती समाधानकारक नाही. हे चित्र बदलण्यासाठी व या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने व सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन प्रयत्न करावे. आनंदाची व समाधानाची बाब म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ प्रेरित संस्था एकत्र येवून या समाजासाठी झटत असल्याने निश्चित बदल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
कार्यशाळेस विदर्भातून सामाजिक संस्थाचे ४७ प्रतिनिधी आले होते. त्यांनी आपले कार्यवृत्त सादर केले. कार्यशाळेचा समारोप रा. स्व. संघ विदर्भ प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांच्या उपस्थितीत झाला. सामाजिक संस्थांनी योजना तयार करून काम करावे. संघटन बांधणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यशाळेस रा. स्व. संघ विदर्भ प्रांत प्रचारक गणेश शेटे, पारधी विकास परिषदेचे उपाध्यक्ष अमरसिंग भोसले, कोषाध्यक्ष सुनील रत्नपारखी, महामंत्री प्रवीण पवार, सहमहामंत्री प्रशांत पवार, रूपेश पवार व प्रांत कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0