चिखलदरा स्कायवॉक मार्चमध्ये सुरू होणार

09 Nov 2025 21:17:03
चिखलदरा, 
chikhaldara-skywalk : चिखलदरा पर्यटन नगरीच्या विकासासाठी १२० कोटी देणार आहोत. निधी कमी पडू देणार नाही. येथील स्कायवॉक मार्चमध्ये सुरू होईल. धारणी येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी देऊ. केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असल्याने नगराध्यक्ष भाजपाचाच हवा, तरच या ठिकाणी विकास शक्य आहे असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
 
 
kl
 
चिखलदरा येथील शहापूर शनिवारी भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी मेळावा नगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत महायुती झाली तर स्वागत आहे. पदाधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन महायुती करावी, तो त्यांचाच अधिकार आहे. त्यांच्या निर्णयाचे आपण स्वागत करू असे त्यांनी स्पष्ट केले. मेळघाटातील आदिवासी बांधवांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असून आदिवासी बांधवांना शासनाच्या योजनांची माहिती मिळणे आवश्यक आहे. यासोबतच मेळघाटातील सर्व समस्या सोडविण्याची जबाबदारी सरकारची असून आम्ही कटिबद्ध आहोत. महाराष्ट्रातील गरजू शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाईल. यासोबतच शेतकर्‍यांना पुढील पाच वर्षापर्यंत मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे. मेळघाटातील नागरिकांना सहा रुपये युनिटप्रमाणे वीज बिल देण्यात येणार आहे. ठिकाणी आठ रुपये युनिटप्रमाणे वीज बिल येते, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली.
 
 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, आमदार केवलराम काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. आमदार काळे यांनी धारणी व चिखलदरामध्ये नगराध्यक्ष भाजपाचा निवडून द्या, असे जनतेला आवाहन केले. भाजपाचे चिखलदरा शहराध्यक्ष वेदांत सुरपाटणे शहराध्यक्ष, रुपेश चौब, हिरुजी हेकडे, मनोज शर्मा, तिलक चावरे, महेंद्र पचोरी, अमोल हाते, बाबू हेकडे, शेख अन्सार, दिनेश चव्हाण, आलोक अलोकार , गजानन खडके, साबूलाल दहीकर, यशवंत काळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0