सतीश पापळकर,
दारव्हा
darva-election : नगर परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. येत्या 10 तारखेपासून नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. संभाव्य उमेदवारांपेक्षा कार्यकर्त्यांमधील उत्साह शिगेला पोहोचला आहे. भाऊ कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मागणार आहेत. ती मिळाली नाही तर आणखी कोणत्या पक्षाकडे भाऊ उमेदवारी मागू शकतात, याकडे कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे. संभाव्य उमेदवाराला कार्यकर्त्यांकडून विचारणा होत आहे की, ‘सांग रे दादा, कोणता झेंडा हातात घेऊ.’ त्यामुळे नागरिकांमध्येही उत्सुकता असून, येत्या तीन-चार दिवसांत चित्र स्पष्ट होणार आहे.
नगर परिषद निवडणुकीत प्रमुख पक्षांसह अपक्ष, तसेच अनेक लहान लहान पक्षदेखील आपले उमेदवार उभे करणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षांकडे अर्ज दाखल केले आहेत. दारव्हा नप अध्यक्ष पदाकरीता शर्यत लागल्याचे चित्र दिसत आहे. अध्यक्षपदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत.
दारव्हा नपत अध्यक्षासह एकूण 22 नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने प्रत्येक पक्षांकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. इच्छुकांनी आपल्या पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला आहे. आचारसंहिता लागू होताच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. सध्या चाचपणी सुरू असलेल्या अर्जातील योग्य उमेदवार कसा निवडावा, त्याकरीता प्रत्येकच पक्षाची कसोटी लागणार आहे.
अध्यक्षपदाचा उमेदवार ठरणार निर्णायक
नप निवडणूकीत अध्यक्षपदाला विशेष महत्व असून त्यामध्ये जुन्यासोबत नवीन इच्छूक उमेदवारही आपली निवड होणार या आशेवर दिसत आहे. त्यादृष्टीने इच्छूक प्रयत्न करीत आहेत. अध्यक्ष थेट जनतेतून निवडून द्यायचा असल्याने त्या उमेदवाराची छाप नगरसेवक पदाच्या उमेदवारावरही पडणार आहे.
तर उमेदवारी न मिळाल्यास काहीजण अपक्ष तर काही जण दुसèया पक्षांकडे उमेदवारी मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. आपल्या जवळचा कोणत्या पक्षाकडून उभा राहणार याचा अंदाज घेत कार्यकर्त्यांमधून ‘कोणता झेंडा हाती घ्यावा लागेल ?’ असा प्रश्न विचारला जात आहे.